मुंबई: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेह्ण्यासाठी आणि शेती संबंधातील योजना तयार करून त्यांची योग्य अमलबजावणी करण्याबाबत केंद्र सरकार आणि विविध राज्यदरम्यान समन्वयाची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. नाबार्डच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना जेटली म्हणाले की, स्वातंत्र्य काळापासूनच शेतकऱ्यांची समस्या हा केंद्र आणि राज्यांच्या विषयपत्रिकेवरील संयुक्त विषय आहे. याचे सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम संभावतात. त्यामुळे या प्रश्नाकडे सर्वांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. केंद्राप्रमाणेच राज्यांनाही या प्रश्नाची तीव्रता कमी व्हावी, असे प्रामाणिकपणे वाटते. मात्र, शेतकऱ्यांची संख्या आणि इतर प्रश्नामुळे हा मुद्दा पूर्णपणे मार्गी लागण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्याने समन्वयाने प्रयत्न केल्यास या प्रश्नाची परिणामकारकता कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.