‘केंद्र’ मालामाल!

0

नवी दिल्ली । वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू केल्यानंतर जुलैच्या पहिल्याच महिन्यात केंद्र सरकारला 92 हजार 283 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ही रक्कम निर्धारित लक्ष्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच ही माहिती दिली. जीएसटीअंतर्गत एकूण 59.57 लाख करदात्यांनी नोंदणी केली असून, 64.40 टक्के कर प्राप्त झालेला आहे. मध्यवर्ती जीएसटीतून 14,894 कोटी, राज्य जीएसटीतून 22,722 कोटी तर संयुक्त जीएसटीतून 47,469 कोटी रुपयांची वसुली झाली असल्याचेही जेटली म्हणाले. दरम्यान जीएसटीमुळे वस्तू व सेवांच्या विक्रीत 40 टक्क्यांनी घट झाल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

जीएसटी भरण्यासाठी मुदत संपली
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात जुलैचा करमहसूल साधारणतः 48 हजार कोटी तर राज्यांचा 43 हजार कोटी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दोन्ही मिळून एकूण लक्ष्य 91 हजार कोटी रुपयांचे होते. परंतु, केंद्राच्या अपेक्षेपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सद्या खुश आहेत. कार व तंबाखू यांच्यावर केंद्राने अतिरिक्त कर लावून व्यसन करणार्‍यांना आणि वाहन शौकिनांना झटका दिला होता. या वस्तूंच्या विक्रीपोटी केंद्राला सर्वाधिक 20 हजार 964 कोटी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला आहे.