केंद्र व राज्य मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल: फडणवीस केंद्रात जाण्याची शक्यता

0

मुंबई । केंद्र व राज्य सरकारमध्ये व्यापक फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यात चंद्रकांत पाटील अथवा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धुरा येऊ शकते. तर दोन्ही मंत्रीमंडळांमध्ये खाते बदल होणार असून काहींना गच्छंती मिळण्याची शक्यता आहे.

मंत्र्यांवर आरोप
राज्य मंत्रीमंडळाच्या प्रतिमेवर अलीकडच्या काळात शिंतोळे उडाले आहेत. प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे पावसाळी अधिवेशनात सरकार बॅकफुटवर असल्याचे दिसून आले. या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसला तरी आगामी फेरबदलात या दोन्ही मंत्र्यांसह अनेकांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

फडणवीसांना बढती
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची चांगली प्रतिमा लक्षात घेऊन त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाचे पद मिळू शकते. असे झाल्यास राज्यात चंद्रकांत पाटील अथवा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येऊ शकते. नवीन फेरबदलात उपमुख्यमंत्रीपदही असेल असे मानले जात आहे. तर राणेंसह काही काँग्रेसी नेते भाजपमध्ये येऊन त्यांना मंत्रीपद मिळू शकते. मात्र एकनाथराव खडसे यांच्याबाबत कुणीही बोलण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे.

केंद्रात मोठे बदल
तर दुसरीकडे केंद्रातही व्यापक बदल होऊ शकतात. मनोहर पर्रीकर आणि व्यंकय्या नायडू यांच्याकडील खात्यांची वाटणी होऊ शकते. तर दुसरीकडे प्रकाश जावडेकर यांना पक्षात पद देऊन त्यांचे खाते विनय सहस्त्रबुध्दे यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. तर काही मंत्र्यांकडील अतिरिक्त खाते एनडीएच्या घटकपक्षांना मिळू शकतात. यात जेडीयू मंत्रीमंडळात सहभागी होणार असून शिवसेनेला एक मंत्रीपद मिळू शकते. काही मंत्र्यांच्या कामकाजावर पंतप्रधान मोदी हे नाराज असून यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत मोदी गंभीर असल्याने या दृष्टीने तयारी म्हणून मंत्रीमंडळात बदल होण्याची शक्यता आहे.