पोषण आहाराच्या दर्ज्याबाबत विद्यार्थ्यांना केली विचारणा ; यावल तालुक्यात तीन शाळांना भेटी
भुसावळ- जिल्ह्यात पोषण आहाराचा काळाबाजार गाजल्यानंतर केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहार समितीतर्फे शाळांची तपासणी होणार होती मात्र समिती येणार असल्याची बाब आधीच लीक करून मुख्याध्यापकांना माहिती पुरवण्यात आल्यानंतर टिकेची झोड उठली असतानाच रविवारी जिल्ह्यात दाखल झालेल्या समितीने सोमवारी यावल तालुक्यातील तीन शाळांमध्ये अचानक सरप्राईज व्हिजीट करीत 28 मुद्यांच्या आधारे तपासणी केली. प्रसंगी समितीने पोषण आहाराची चव घेत विद्यार्थ्यांनाही दिल्या जाणार्या पोषण आहाराच्या दर्ज्याबाबत माहिती विचारली.
यावल तालुक्यात तीन शाळांना भेट
यावल तालुक्यातील अंजाळे येथील जिल्हा परीषद शाळेत सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन महिला व पाच पुरूष असलेल्या समितीचे सदस्य धडकले. तब्बल तीन तास समितीने या शाळेत चौकशी केली. शालेय पोषण आहार बनवणार्या स्वयंपाकीने सदस्यांनी संवाद साधत काही प्रश्न विचारले तर प्रत्येक वर्गातून पाच विद्यार्थी व पाच विद्यार्थिनींना बोलावून त्यांनाही पोषण आहाराबाबत प्रश्न विचारण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वजनाची तसेच उंचीची मोजणी करण्यात आली तसेच शालेय पोषण आहाराचा स्टॉक, रोजकीर्द, कीचन शेड तपासणीसह तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अंजाळे गावातील नूतन माध्यमिक हायस्कूललस यावल तालुक्यातील राजोरा व अकलूद शाळेलाही समितीने भेट दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, समितीतील सदस्यांमध्ये श्वेता पटेल, दिव्या पटेल, भूपेंद्र सिंग, श्रीशंकपाल, तडवी, सपकाळे, खाजिकर, शिक्षणाधिकारी भास्कर जे.पाटील यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
समितीच्या कारवाईकडे लागले लक्ष
आधीच गाजावाजा करून जिल्ह्यात समिती दाखल झाल्याने मुख्याध्यापक अलर्ट झाले आहे तर 2014 मध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला मुदतबाह्य साठ्यानंतर ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही तसेच 2017 मध्ये पकडण्यात आलेला काळ्याबाजारातील तांदूळ असो की भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या आहारात गोमसह अळ्या असो तसेच बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण गाजूनही पुरवठादाराला मिळालेल्या क्लीनचीटमुळे समिती नेमका आता काय अहवाल देणार व दोषींवर आतातरी कारवाई होणार का? याकडे सुज्ञ जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.