केंद्राविरोधात सर्वांनी एकत्रित यावे: सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा हुंकार

0

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला घेरण्याच्या उद्देशाने विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत आज बुधवारी बैठक बोलविली आहे. बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्यांच्या जीएसटीतील वाटा, देशभरात जेईई एनईईटी परीक्षा स्थगित करण्यासहीत अनेक मुद्यांवरही डिजिटल बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्यात आला होता. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र उद्धव ठाकरे हे या बैठकीला हजर झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह विविध राज्याचे ७ मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच मुख्यमंत्र्यांनी परीक्षा न घेण्याची भूमिका मांडली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात न घालता परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. परीक्षा घेण्याशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण न करणे हा आमचाही उद्देश आहे, मात्र सध्याची परिस्थिती तशी नसल्याने परीक्षा घेणे अवघड आहे असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सर्व राज्यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जीएसटीचा परतावा वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे त्याबद्दलही या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारकडून कोरोनासाठी आवश्यक सुविधा देण्यात येत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.