भाजपच्या शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
पिंपरी-चिंचवड : शहरातील केंद्र सरकारशी निगडीत असलेले संरक्षण, रेडझोन, बोपखेल पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत आगामी 15 ते 20 दिवसात बैठक घेण्याचे नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे या शिष्टमंडळात होते. नितीन गडकरी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौर्यावर आले होते. नाशिक फाटा, भोसरी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाजप पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
प्रलंबित प्रश्नांचा तिढा कायम
शहरातील रेडझोनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तळवडे, रुपीनगर, चिखली हा पट्टा रेडझोनच्या हद्दीत येतो. बोपखेल आणि पिंपळे-सौदागर येथील रक्षक चौकातील रस्ता लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण विभागासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, गोव्यातील राजकीय तिढ्यानंतर त्यांना पुन्हा गोव्यात परतावे लागले. त्यामुळे संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात होती.
संरक्षण मंत्र्यांसोबत लवकरच बैठक
भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण, रेडझोन, नदीसुधार प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली. या प्रश्नांसदर्भात लवकरच संबंधित विभागाच्या अधिकार्यांची संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे, असेही एकनाथ पवार यांनी सांगितले.