केंद्र सरकार संविधानाऐवजी मनुस्मृतीचे प्रतिगामी मुल्य रूजवत आहे – कॉ.सुभाषिनी अली

0

अंबाजोगाई : संविधानाने देशात स्त्री-पुरूष,सामाजिक भेद मिटवून समान अधिकार दिलेले आहेत. त्या संविधानाला बाजूला करून आजचे सत्तारूढ भाजपा सरकार मनुस्मृतीचे प्रतिगामी मुल्य रूजवत आहे. महिलांचे स्वातंत्र्य, अस्तित्व नाकारून तिला संपत्ती मानले जाऊ लागले आहे.आर्थिक शोषणा बरोबरच सामाजिक शोषणात वाढ होत असून जातीय,धार्मिक उन्माद प्रसारमाध्यमांचा उपयोग करून वाढविला जात आहे. असे प्रतिपादन कॉ.सुभाषिनी अली यांनी केले.

अंबाजोगाईत आद्यकवि मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात माजी खासदार कॉ.गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या 10 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत कॉ.सुभाषिनी अली बोलताना म्हणाल्या की, आरएसएस संबधित सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवाद, राष्ट्रभक्तीच्या व्याख्या भावनिक मुद्यांभोवती तयार करण्यात येवू लागल्या आहेत. संसदेच्या आवारात इंग्रजांशी लढताना फासावर गेलेल्या शहीद भगतसिंगांची प्रतिमा लावणे नाकारले जाते. संविधानाची प्रत खुलेआम पद्धतीने जाळली जाते, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.उलट आजच्या सरकारची त्यांना मुकसंमती दिसते आहे. परंतु,सरकारची ही पावले ओळखून देशभर विद्यार्थी,युवक,महिला रस्त्यावर उतरून विरोध दर्शवित आहेत. या एकीच्या बळावरच येणार्‍या काळात संविधान वाचू शकते. कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे सारख्या विना-तडजोडवादी लढणार्‍या व्यक्तीची गरज पुन्हा निर्माण झाली आहे.असेही कॉ.अली यांनी म्हंटले.

प्रास्ताविक करताना अ‍ॅड.अजय बुरांडे म्हणाले की, प्रतिष्ठाणचे व कुटुंब सदस्य डॉ.विजय बुरांडे यांच्या जाण्याने दुःख जरी झाले असले तरी प्रतिष्ठाणची जबाबदारी विचारांचा जागर व समाज प्रबोधनाची गरज असल्यामुळे हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले होते. कॉ.अप्पांचा विचार आम्ही कृतीमधून पुढे नेण्याचे प्रयत्न प्रतिष्ठाणच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्रा.बाबासाहेब सरवदे यांनी प्रतिष्ठाणचे सदस्य डॉ.विजय बुरांडे यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडून त्यांचे कार्य विषद केले. व्याख्यानासाठी सभागृहात सामाजिक,राजकिय, शिक्षण, विधी, वैद्यकीय,साहित्य, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते,महिला,युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.