केजरीवालांचा मदरबोर्ड

0

अखेर मतदान यंत्राला आव्हान देणार्‍यांचे पितळ उघडे पडले आहे. निवडणूक आयोगाने यंत्रामध्ये काही गफलत करणे अशक्य असल्याचा दावा आरंभापासूनच केलेला होता. पण, ज्यांना पराभव पचवता येत नाही, त्यांचे कोणीही समाधान करू शकत नसते. म्हणूनच आयोगाने आपल्या यंत्राविषयीची तपशीलवार माहिती विविध पक्षांना एकत्र करून समजावली होती. तरीही आपल्या मूर्खपणाचा हट्ट आम आदमी पक्षाला सोडता आला नाही. त्यामुळेच आयोगाने यंत्रात गफलत करून दाखवण्याचे आव्हान सर्वच पक्षांना देऊन टाकले. कारण केजरीवाल यांनी मूर्खपणाची परिसीमा ओलांडली होती. त्यांच्या मूर्खपणाला दाद देण्यापेक्षाही सामान्य माणसांचा विश्‍वास जपण्याला महत्त्व असते. म्हणूनच ज्या प्रकारचे प्रात्यक्षिक केजरीवाल समर्थकांनी करून दाखवले होते, त्याच प्रकाराने आयोगाच्या यंत्रामध्ये गफलत करून देण्याचे हे आव्हान होते. पण ते पेलण्याची हिंमत त्याही पक्षाला दाखवता आली नाही. त्यांनी त्याहीपुढे जाऊन काय मागणी करावी? यंत्र उघडून त्याचा मदरबोर्ड काढण्याची मुभा मिळायला हवी. त्याचा अर्थ काय होतो? इंजिनीअर असलेल्या केजरीवालना तरी त्याचा अर्थ कळतो काय? मतदान यंत्र केंद्रात असते आणि त्याच्याभोवती कडेकोट बंदोबस्त असतो. साहजिकच त्यात कुठलीही गफलत करायची मोकळीक नसते. पण, केजरीवाल यांच्या पक्षाला थेट यंत्र उघडून त्यात गफलत करण्याची मोकळीक हवी आहे. मग त्यासाठी इंजिनीअर कशाला हवा? कोणीही भुरटा गुंड त्यात गफलत करू शकेल? उत्तर प्रदेशात 90 हजार यंत्रे वापरली गेली आणि इतक्या यंत्राला सील केल्यावर त्याचा मदरबोर्ड कोणी बदलला होता, असा या मूर्खांचा दावा आहे काय? आइन्स्टाइन नावाचा वैज्ञानिक म्हणतो, एकवेळ या विश्‍वाच्या पसार्‍याला सीमा असू शकते. पण मूर्खपणाला कुठलीही सीमा असू शकत नाही. केजरीवालनी तेच सिद्ध केले आहे.

देशात लाखो मतदान केंद्रे असतात आणि तिथे यंत्राभोवती कडेकोट बंदोबस्त असताना लोक आपले मत नोंदत असतात. पण, तिथे मतदान करताना काही बटणे दाबून सर्वच मते एका पक्षाच्या खात्यात फिरवता येऊ शकतात, असा आम आदमी पक्षाचा दावा होता. तेच प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलेले होते. त्या प्रात्यक्षिकामध्ये कुठेही यंत्राचा मदरबोर्ड उचकटून काढल्याचे वा तशी गरज असल्याचे त्यात दाखवलेले नव्हते. म्हणजेच प्रात्यक्षिकात जे काही सांगितले गेले, त्यावर त्याच पक्षाचा जरी विश्‍वास असता, तर त्यांनी आयोगाचे आव्हान स्वीकारले असते. पण, केजरीवाल वा त्यांचे सहकारी पक्केखोटे बोलतात आणि आपण खोटे बोलतोय याची त्यांनाही खात्री आहे. म्हणूनच कधीही आपल्या शब्दावर ते टिकून रहात नाहीत. साहजिकच त्यांनी आव्हान स्वीकारले नाही आणि आता यंत्र उघडण्याची संमती मागत आहेत. मुद्दा इतकाच, की अशा रितीने कुठल्याही मतदान केंद्रातील यंत्राला उघडून त्याचा मदरबोर्ड बदलण्याची वा त्यात गफलत करण्याची लबाडी होऊ शकते काय? ज्या केंद्रामध्ये विविध पक्षाचे उमेदवारांचे प्रतिनिधी हजर असतात. त्यांच्या डोळ्यादेखत कोणी यंत्राशी अशी उचापत करू शकतो काय? असेल तर तिथे हजर असलेले सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे प्रतिनिधीही त्या कारस्थानात सहभागी असायला हवेत. याचा अर्थ जिथे आम आदमी पक्षाची मते अशा रितीने पळवली गेली, तिथले त्या पक्षाचे प्रतिनिधीही अशा भाजपप्रणीत लबाडीत सहभागी असायला हवे. आयोगावर नाही तरी पक्षाने आपल्या प्रतिनिधींवर तरी विश्‍वास ठेवायला नको काय? भाजपचा कोणी प्रतिनिधी यंत्रात हस्तक्षेप करीत असताना बाकी कोणी मतदान केंद्रात आक्षेप घेतला नसता काय? पण खुळेपणाला सीमा नसते हेच खरे. अन्यथा, त्या पक्षाच्या एका नेत्याने यंत्र उघडून मदरबोर्ड बदलण्याची मागणी केलीच नसती.

उद्या तशीही मोकळीक दिली आणि त्यातून काहीही सिद्ध करता आले नाही, तर मतदानकेंद्र काबीज करून खोटेच मतदान केल्याचाही केजरीवाल आरोप करतील. पुढे तो सिद्ध करण्यासाठी बंदुका घेऊन मतदान केंद्र काबीज करण्याचीही मोकळीक असली पाहिजे, अशी मागणी करू शकतील. पूर्वीच्या काळात असे सातत्याने घडलेले आहेत. अनेक भागात अशा घटना घडत होत्या. गुंडगिरी करायची वा मतदान कर्मचार्‍यांना भयभीत करून केंद्रावर कब्जा मिळवला जायचा. मग तिथे बसून ते गुंड मनमानी करीत मतदानपत्रिका ताब्यात घ्यायचे आणि हवे तिथे शिक्के मारून आपल्या उमेदवाराला विजयी करू शकत होते. त्यालाच पायबंद घालण्यासाठीच यंत्र हा नवा पर्याय शोधला गेला. यंत्राची तपासणी सर्व पक्षांच्या उपस्थितीत करून, मगच त्याला सील ठोकले जाते आणि पुढे मतमोजणीच्या वेळी सील तपासूनच यंत्रातील मतांची मोजणी केली जात असते. त्यात मध्यंतरी कुठेही यंत्र उघडण्याची वा त्याचा मदरबोर्ड बदलण्याची सवड असू शकत नाही. यंत्राला हॅक केले, असा केजरीवाल यांचा पहिला आरोप होता. या इंजिनीअर झालेल्या निर्बुद्धाला हॅक म्हणजे काय, त्याची तरी जाण आहे काय? कुठेही दूर बसून परस्पर एखाद्या यंत्राच्या रचना किंवा आज्ञावलीत बदल केला जातो, त्याला हॅक करणे म्हणतात. यंत्र उघडून त्यात हेराफेरी करण्याला हॅक म्हणत नाहीत. पण असे आरोप करणारे केजरीवाल मूर्ख अजिबात नाहीत, हा माणूस पक्का बदमाश आहे. लोकांच्या मनात गोंधळ उडवून देणे व शंकावर आपला मुद्दा पुढे रेटणे; यात त्याने कौशल्य संपादन केलेले आहे. म्हणूनच तो इतके बेताल आरोप करू शकतो. पण, त्यांच्यावरील सज्जड पुराव्यानिशी आरोप झाले व संबंधितांवर धाडी पडल्या, त्याविषयी अवाक्षरही बोलणार नाही. अशा बदमाशांचा सार्वजनिक जीवनात सुळसुळाट झाल्यामुळेच हल्ली लालूप्रसादही खूप सभ्य माणूस वाटू लागला आहे.

सौरभ नावाच्या ज्या नेत्याने दिल्ली विधानसभेत मतदान यंत्रात गफलतीचे प्रात्यक्षिक केले होते, त्यानेही यंत्राला उघडून त्यातला मदरबोर्ड बदलण्याची कुठली क्रिया दाखवलेली नव्हती. मग आता आयोगाचे आव्हान त्यांच्या पक्षाने कशाला स्वीकारलेले नाही? तर आपला खोटारडेपणा त्यांनाही पक्का ठाऊक आहे. पण तोंड लपवायला जागा नाही, म्हणून मग मूळच्या मागणीत बदल करून मुद्दाच बदलून टाकायचा. हीच केजरीवाल टोळीची रणनीती किंवा मोडस ऑपरेन्डी राहिली आहे. त्यांच्यासारखे बदमाश भारतीय समाजाने प्रथमच बघितलेले नाहीत. अशा एकाहून एक बदमाशांना संत महंत म्हणून डोक्यावरही घेतलेले आहे. पण त्यांच्या लबाड्या उघडकीस आल्या तेव्हा त्यांना धुळीसही मिळवलेले आहे. केजरीवाल यांच्यावर लवकरच तशी पाळी येणार आहे. कुठल्याही बदमाशीने लबाडीने लोकांना चकित करता येते किंवा भोंदूगिरी करून भारावूनही टाकता येते. पण एका ठरावीक काळानंतर भारावलेपणा कमी होत जातो आणि लोकांनाही शुद्ध यायला लागते. तेव्हा लोक प्रश्‍न विचारू लागतात. शंका घेऊ लागतात. आज कपील मिश्रा किंवा आणखी काही मूठभर लोक, तशा शंका व्यक्त करीत आहेत. त्यावरून चौकशाही सुरू झाल्या आहेत. त्यापासून पलायान केल्याने फारकाळ निसटता येणार नाही. कारण या चौकशांच्या पुढली पायरी कोर्टातले आरोपपत्र असेल आणि देशातील जनतेचा कोर्टावर नक्कीच विश्‍वास आहे. ते आरोप जेव्हा कोर्टाच्या चर्चेत व सुनावणीत चघळले जातील, तेव्हा केजरीवाल यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्व आणि राजकारणाचा मदरबोर्ड उचकटून बाहेर काढला जाणार आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्राचा मदरबोर्ड उघडण्याची मागणी करण्यापेक्षा, केजरीवाल आणि टोळीने आपल्या राजकारणाच्या मदरबोर्डमध्ये आहेत, त्या गफलतीचे खुलासे व डागडुजी सज्ज राखलेली बरी.