नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या निर्णयावर कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी टीका केली होती. दरम्यान भाजपाचा जुना सहयोगी पक्ष असणाऱ्या शिवसेनेने यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून मोदींवर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेने ‘पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियाचा त्याग करीत आहेत काय? असा प्रश्न मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर जरूर निर्माण झाला. तथापि याच हत्याराला मोदींनी नाट्यमय धार लावली हे दुसऱ्या ट्विटमधून पुढे आले. मोदी यांची ही नाट्यछटा काही तास देशभरात रंगली. शेवटी सोशल मीडियाचे व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्य असल्याचे म्हटले आहे.
आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे भाजपच्या सायबर फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल, पण फौजेला आता नवे काम मिळाले आहे. काही तासांच्या अफवेचा एवढाच अर्थ आहे असं म्हणत मोदींवर टीका करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करुन नवीन खुलासा केला. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने त्यादिवशी माझं सोशल मीडियावरील अकाऊंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या महिलेकडून आपल्या प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे