केजरीवालांनी जेठमलानींना हटवले

0

नवी दिल्ली । ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यापुढे मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बचाव करणार नाहीत. केजरीवाल यांनी जेठमलानी यांची मानहानी खटल्यात वकिली करण्यापासून मुक्तता केली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात केजरीवाल अडकले आहेत. जेटली यांनी मागील आठवड्यात केजरीवालांविरोधात दुसरा मानहानीचा खटला दाखल केला आहे. मानहानी प्रकरणाची सुनावणी सुरू असताना जेठमलानी यांनी जेटलींबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने 10 कोटींचा आणखी एक मानहानीचा दावा केजरीवालांविरोधात दाखल करण्यात आला आहे. यामुळे नारज झालेल्या केजरीवाल यांनी जेठमलानी यांना त्यांच्या कामातून मुक्त केले आहे. मात्र दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी डिसेंबर 2015 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या सहा नेत्यांवर मानहानीचा खटला दाखल केला. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना जेटली यांनी आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता. यावर अरुण जेटली यांनी पुरावे देण्याचे आव्हान केजरीवालांना दिले होते. या प्रकरणी केजरीवालांचा बचाव करताना तुमच्या सन्मानाचे कसे नुकसान झाले आणि याची भरपाई कशी होऊ शकत नाही?, असे प्रश्‍न जेठमलानी यांनी जेटलींना विचारले.

केजरीवाल यांची बाजू मांडणार्‍या जेठमलानी यांनी 17 मे 2017 रोजी जेटली यांना बदमाश म्हटले. यावेळी जेटली यांनी तुम्हाला अशा आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याची परवानगी केजरीवाल यांनी दिली आहे का?, असा प्रतिप्रश्‍न जेटली यांनी जेठमलानी यांना विचारला. केजरीवालांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याची परवानगी दिली असल्यास 10 कोटी रुपयांचा आणखी एक मानहानीचा खटला दाखल करणार आहे, असेही अरुण जेटली यांनी यावेळी म्हटले आहे.