केजरीवालांसह सहा जणांवर दावा

0

नवी दिल्ली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा जणांवर अरुण जेटली मानहानी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी करण्यास पटियाला हाऊस न्यायालयाने मंजुरी दिली आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असताना 2013 पर्यंत अरुण जेटली यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला होता. जेटली यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत केजरीवाल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करत 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. या संदर्भात जेटली यांनी केजरीवाल, राघव चढ्ढा, कुमार विश्‍वास, आशुतोष, संजयसिंग आणि दीपक वाजपेयी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

शनिवारी न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आपच्या इतर नेत्यांनी या प्रकरणात करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत दाव्यावर सुनावणी करण्याची मागणी केली. भाजपचे वरिष्ठ नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, आपच्या नेत्यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांची आणि परिवारातील इतर सदस्यांची बदनामी केल्याचा आरोप केला. या प्रकरणात सोशल मीडियामधूनही बदनाम केल्याचे जेटली यांनी याचिकेत म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यातर्फे राम जेठमलानी यांनी बाजू मांडली. या प्रकरणात राम जेठमलानी आणि अरुण जेटली यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती.

याआधी 1 मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अरून जेटली यांची बँक खाती, आयकर परतावा आणि अन्य आर्थिक बाबींशी संबंधीत असलेली कागदपत्र उपलब्ध करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. जेटली यांच्या परिवारातील सदस्यांच्या बँक खात्यातील व्यवहार, कुटुंबातील सदस्यांची 10 टक्के भागिदारी असलेल्या कंपन्याची माहिती मागवणे हे फुकटची चौकशी करण्यासारखे असून त्यात काही दम नाही, असा शेरा त्यावेळी उच्च न्यायालयाने मारला होता.