केजरीवाल आणि तरुण तेजपाल

0

आम आदमी पक्षाचा नुकताच पक्षातून हाकललेला मंत्री कपिल मिश्रा याने आता दिल्लीत सत्याग्रह आरंभलेला आहे. त्याच्याच पक्षाचे पाच नेते परदेशी कुठल्या कामासाठी गेले होते आणि त्यांचा खर्च कोणी केला? कुठल्या पैशातून तो खर्च झाला? त्यातून कुठले राष्ट्रकार्य साधले गेले? अशा प्रश्‍नांची उत्तरे मुख्यमंत्री केजरीवाल देत नाहीत, तोपर्यंत त्याचा सत्याग्रह चालू राहील, असे त्याने जाहीर केले आहे. दोन दिवस या कपिल शर्माने दिल्लीत व राष्ट्रीय माध्यमात एकच धमाल उडवून दिलेली आहे. त्याच्या आरोपांना उत्तर देण्याची हिंमत केजरीवाल करू शकले नाहीत आणि त्यांनी तोंड लपवून बिळात दडी मारणे पसंत केले. आपल्या अन्य सहकार्‍यांना पुढे करून केजरीवाल गप्प झाले आहेत. ही बाब मोठी शंकास्पद आहे. कारण कपिलने आपण गुरूकडूनच ही विद्या शिकलो व आता गुरूवर शरसंधान करीत असल्याचेही साफ सांगून टाकले आहे. तो गुरूकडून जी विद्या शिकला ती ब्लॅकमेलची आहे. केजरीवाल हे उत्तम ब्लॅकमेलर आहेत. त्यातल्या कुशलतेच्या आधारे त्यांनी सार्वजनिक जीवनात आपली प्रतिमा उभी केलेली आहे आणि त्याच आधारावर त्यांनी आपल्याभोवती एक निष्ठावानांचा गोतावळा निर्माण केला आहे. पण तरीही आज त्याच गुरूला आपल्या शिष्याला ब्लॅकमेल करून गप्प बसवणे शक्य झालेले नाही. इतके असे काय केजरीवालचे लफडे कपिल मिश्राच्या हाती लागलेले आहे, की या गुरूची बोलती एकदम बंद होऊन गेलेली आहे? त्याचे गूढ उकलायचे असेल, तर तीन वर्षे मागच्या तरुण तेजपालच्या भानगडीचा इतिहास उलगडण्याची गरज आहे. आपल्या ब्लॅकमेल पत्रकारितेतून नावारूपाला आलेल्या तेजपालने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती आणि कोणालाही बेधडक ब्लॅकमेल करण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. मग तोच त्या जाळ्यात कसा सापडला?

तरुण तेजपाल तहलका नावाची एक वेबसाइट चालवत होता आणि त्यात छुप्या कॅमेर्‍याने चित्रण करून अनेकांना जाळ्यात फसवत होता. त्यातून राजकीय सुपार्‍या घेऊन भल्या भल्या राजकीय नेत्यांना त्याने पाणी पाजले होते. परिणामी, त्याचा एक दबदबा तयार झाला होता. त्यातून शिरजोर झालेल्या तेजपालने अनेक उद्योग आरंभले होते. अशाच एका उद्योगात त्याला नेमके सापळ्यात ओढले गेले. गोव्यात त्याच्या संस्थेतर्फे एक सेमिनार भरवण्यात आला आणि तिथेच घडलेली एक घटना तेजपालला गोत्यात घालणारी ठरली. त्या सेमिनारच्या निमित्ताने एका रात्री त्याच्याच संस्थेतील एका तरुण मुलीशी अतिप्रसंग केल्याचा तेजपालवर आरोप होता. त्यावर पांघरूण घालण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. सवकलेला गुन्हेगार असला मग तो अशीच गाफील कृती करत असतो. आपल्या जुन्या सहकार्‍यांच्या तरुण मुलीला नोकरी दिल्याचा बदल्यात तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयास त्याने केला होता. तिचा प्रतिसाद मिळाला नाही व तिने त्याविषयी लेखी तक्रार व्यवस्थापनाकडे केली, तेव्हा तेजपालने ई-मेल लिहून त्यावर पडदा टाकण्याचा उद्योग केला. याचा अर्थ असे प्रकार राजरोस चालू होते आणि अशाच रीतीने दडपले जात होते. अन्यथा तेजपाल असा सहजगत्या ई-मेल लिहून फसला नसता. पण तोच त्याचा फास ठरला. त्यावरून गवगवा झाला आणि तेजपाल फरारी झाला. त्याला पकडणे वा हुडकणे अशक्य होते. आपण निरपराध असल्याचे तेजपाल अनेक मित्रांकरवी जाहीर करत होता. पण जिथे गुन्हा झाला, त्या गोवा पोलिसांसमोर हजर होत नव्हता. साहजिकच त्याला गाफील करून सापळ्यात ओढण्याचा डाव खेळला गेला. त्यात तेजपाल आपोआप चालत आला. आपण कुठे फसतोय, त्याचाही त्याला अंदाज येऊ शकला नाही. सराईत गुन्हेगार असेच बेफिकीर असतात. केजरीवाल त्याला अपवाद नक्कीच नाही.

गोव्यात जी घटना घडली, त्यात सदरहू मुलीशी तेजपालने लिफ्टमध्ये अतिप्रसंग केल्याचा गवगवा झालेला होता, तर गोवा पोलिसांनी त्या लिफ्टमधील सीसीटीव्ही ़फुटेज आपल्या हाती आले असल्याचा दावा केला. त्यानंतर तेजपाल ़फुशारला. जे काही ़फुटेज आहे, ते प्रक्षेपित करा आणि आपण निर्दोष असल्याचे त्यातून सिद्ध होईल, असे प्रतिआव्हान त्याने दिलेले होते. तेवढेच झाले नाही. पोलिसांजवळ तितकाच पुरावा असल्याचा गैरसमज करून घेत, तेजपाल गोव्याला येऊन दाखल झाला. पण तो हाती लागण्यापर्यंत गोवा पोलिसांनी हे अर्धसत्य कायम चालू ठेवलेले होते. लिफ्टमध्ये असे काही झालेलेच नव्हते, याविषयी तेजपालला आत्मविश्‍वास होता. म्हणून तो हजर झाला. कारण पोलिसांजवळ तितकाच पुरावा आहे, असे त्याला भासवण्यात आलेले होते. वास्तवात तसा कोणताही पुरावा पोलिसांजवळ नव्हताच. लिफ्टमध्ये तसा कुठलाही कॅमेराच नसेल, तर चित्रण तरी कुठून सापडावे? पण तेजपाल तिथेच फसला. चित्रण लिफ्टमधले नव्हते, तर लॉबीतल्या झोंबाझोंबीचे चित्रण पोलिसांकडे उपलब्ध होते आणि त्याविषयी तेजपालला संपूर्ण गाफील ठेवले गेले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतरच गोवा पोलिसांनी लिफ्टमध्ये कॅमेराच नव्हता, तर लॉबीतले चित्रण पुराव्यादाखल असल्याची वस्तुस्थिती सांगितली होती. ते आधीच जाहीर केले असते, तर तेजपाल उघड्यावर आला नसता, की हजर झाला नसता. पण त्याला तसा गाफील ठेवण्यासाठीच लिफ्टमधील चित्रणाचा खोटा दावा करण्यात आला होता. तेजपाल हातात आल्यावर खरा पुरावा जाहीर करण्यात आला. आताही कपिल मिश्रा नेमकी तीच भाषा बोलतो आहे. त्याने मुख्यमंत्री निवासात दोन कोटी रुपये सत्येंद्र जैन यांनी केजरीवालना दिल्याचे वक्तव्य केले असले, तरी त्याचा कुठलाही पुरावा समोर आणलेला नाही. पण तसा अन्य कुठला तरी पुरावा नक्कीच उपलब्ध असणार.

कपिल मिश्राने अनेक आरोप केलेले आहेत आणि त्यात काही पुरावे केजरीवाल नष्ट करू शकतील, म्हणून त्याची जाहीर वाच्यता करीत नसल्याचे म्हटलेले आहे. त्याचा अर्थ असा होतो, की कुठले पुरावे कपिलजवळ आहेत आणि कुठले पुरावे तो पोलिसांना देणार, याविषयी आम आदमी पक्षाच्या गोटात गोंधळ उडवून देण्याचा डाव त्याने टाकलेला आहे. तोच एक सापळा आहे. केजरीवाल व त्यांच्या साथीदारांनी एक एक आरोपाचा इन्कार करावा आणि ज्याचे पुरावे कपिलकडे असतील अशी शंका आहे, ते पुरावे नष्ट करण्याचा आटापिटा करावा, असा हा सापळा आहे. असे पुरावे नष्ट करताना केजरीवाल यांना अनेक सरकारी कागदपत्रात हेराफेरी व अफरातफरी कराव्या लागणार आहेत. पण तसे करू गेल्यास कोण कुठून नजर ठेवून आहे, त्याचीही भीती मनात असणार आहे. शत्रू गोटात गोंधळ माजवणे ही एक रणनीती असते. ती लागू केली मग शत्रूची तारांबळ उडते आणि त्यांच्याकडून नको तशा चुका होऊ लागतात. त्या चुकांमधून उजळमाथ्याचे गुन्हेगार आपणच पुरावे आणून देत असतात. कपिलजवळ वा अन्य कोणाजवळ आपल्या विरोधातले कुठले पुरावे आहेत, त्याच्याच भयाने सध्या केजरीवाल गोटाला पछाडले आहे. अशावेळी आपल्या तोंडून कुठली गोष्ट चुकून निघायची भीती असल्यानेच, केजरीवाल अवाक्षरही बोलायला धजावलेले नाहीत. आपला तेजपाल होण्याच्या भीतीने या ब्लॅकमेलर गुरूला भयभीत केले आहे. कपिल मिश्रा हा आजवर केजरीवालना गुरू मानत होता आणि त्यांच्या वतीने कोणावरही भूंकतही होता. साहजिकच अनेक गोष्टी त्याच्यासमोर घडल्या आहेत आणि त्याचे पुरावे नसले तरी धागेदोरे त्याला माहिती आहेत. म्हणूनच केजरीवालची पाचावर धारण बसली आहे. कपिलकडे पुरावे मागितले जात आहेत. शंका संशयाला उत्तरे देण्यापेक्षा मतदान यंत्राचा डंका वाजवण्याचा खेळ सुरू आहे. तमाम आप प्रवक्त्यांची स्थिती जगजित सिंगच्या गझलेसारखी झाली आहे.

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो।
क्या गम है जिसको छुपा रहे हो।