नवी दिल्ली । आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले आणि दिल्ली सरकारमधील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आणि आम आदमी पक्षाचे हवाला कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप आपचे बडतर्फ नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे. कपिल मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी व्हायरल केलेला मुकेश कुमार नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ बनावट असल्याचेही त्यांनी सांगितले. हेमप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठीच केजरीवालने मुकेश कुमारला पुढे केले आहे. पक्षाने घरीच कंपन्यांचे बनावट लेटरहेड तयार केले तसेच ज्या सनविजय कंपनीकडून देणगी घेतल्या गेली त्या कंपनीच्या लेटरहेडवरील मुकेश कुमारची सहीसुद्धा खोटी असल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे. दरम्यान, केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची मी वारंवार पोलखोल करत असल्याने माझा खून केला जाऊ शकतो, अशी भीती कपिल मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी पक्षाला मुकेशकुमारने पक्षाला निधी दिला. त्यावेळी तो कंपनीमध्येही नव्हता. केजरीवाल यांनी मुकेशकुमारच्या दाव्याची प्राथमिक चौकशी केलीच नाही. मुकेश दिवाळखोर आहे. त्याची इमारत सील करण्यात आली आहे. जो व्यक्ती व्हॅट देत नाही, कर देत नाही पण केजरीवाल यांच्या पक्षाला 2 कोटी रुपये कसे देतो? असा प्रश्नही कपिल मिश्रा यांनी उपस्थित केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हवाला कनेक्शन असून आपच्या सदस्यांच्या परदेश दौर्याची माहिती उघड झाली तर केजरीवाल यांना देश सोडून पळावे लागेल, असा दावाही कपिल मिश्रा यांनी केला आहे.