केजरी जुगाराची गोष्ट

0

नकारात्मकता कधीही सकारात्मक परिणाम घडवत नाही. एकनाथ महाराजांचे एक भारूड आहे, ‘रोडगा वाहीन तुला’. अनेकजण राजकारणात हल्ली तसेच वागतात. आपण काय मिळवायचे आहे, यापेक्षाही दुसर्‍या कुणाला काय मिळू द्यायचे नाही, याकडे आपली शक्ती केंद्रीत करून बसतात. मग दुसर्‍याचे नुकसान होण्यातच धन्यता मानायची नामूष्की त्यांच्यावर येत असते. २०१३ च्या अखेरीस चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यात दिल्ली वगळता भाजपाने तिनही राज्यात आपले निर्विवाद बहूमत संपादन केलेले होते. दिल्लीत मात्र भाजपाचे बहूमत आम आदमी पक्ष नावाच्या नवख्या संघटनेने हाणुन पाडले होते. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता आणि त्यानंतरचा नंबर केजरीवाल यांच्या पक्षाचा लागला होता. पंधरा वर्षे सत्तेत बसलेल्या कॉग्रेसचा दिल्लीसह तमाम राज्यात धुव्वा उडालेला होता. अशावेळी आपल्या पराभवाची मिमांसा करण्यापेक्षा भाजपाला सत्तेपासून रोखण्यात कॉग्रेसला धन्यता वाटलेली होती. म्हणूनच त्या पक्षाने केजरीवाल यांना बिनशर्त पाठींबा देऊन सत्तेवर बसण्यास मदत केली. त्यातून कॉग्रेसचे काय कल्याण होणार होते? पण त्याच्याशी त्या शतायुषी पक्षाला कर्तव्यच नव्हते. भाजपाला सत्तेपासून वंचित ठेवणे, हेच जणु या पक्षाचे ध्येय झालेले होते. त्यातही काही नवे नव्हते. दिर्घकाळ कॉग्रेसने अशाच पद्धतीने आपली नासधूस करून घेतलेली आहे. वाजपेयींना सत्तेपासून वंचित ठेवताना कडबोळ्याचे सरकार आणले गेले, तेव्हापासून ही ‘रणनिती’ कॉग्रेसने अनेकदा राबवलेली आहे. तशीच ती दिल्लीतही राबवली गेली आणि पुढल्या काळात त्या महानगरी राज्यातून कॉग्रेस पुरती नामशेष होऊन गेली. नकारात्मक विचाराने यापेक्षा वेगळे काही होऊ शकत नाही. आता तेच म्हणे महाराष्ट्रातही करायचे मनसुबे रचले जात आहेत.

महाराष्ट्रात भाजपाने ताज्या निवडणूकांमध्ये मोठी मुसंडी मारल्याने अनेक चाणक्यांना पर्याय म्हणून फ़डणवीस सरकार पाडण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मुंबईत पालिकेत शिवसेनेला पहिला नंबर मिळाला तरी भाजपाने मोठी मुसंडी मारल्याने बहूमताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात कॉग्रेसला मिळालेली मते दिल्लीप्रमाणे सेनेला सत्तेपर्यंत घेऊन जाणारी आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यासाठी कॉग्रेसने तसा पाठींबा सेनेला देण्याच्या बातम्या आहेत. अजून काही स्पष्ट नाही. इतक्यात राज्यातही सत्तांतर करण्याचे कारस्थानी मनसुबे कानावर येऊ लागले आहेत. विधानसभेतील आमदारांची संख्या बघितली तर कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची बेरीज नेमकी बहूमताच्या आकड्याला पार करणारी आहे. तेव्हा त्याच तिघांनी एकत्र येऊन पर्यायी सरकार स्थापन केले तर? पण तसे केल्यास शिवनेसोबत गेल्याची किंमत कॉग्रेसला देशभर मोजावी लागेल. म्हणून तसे थेट न करता सेनेला बाहेरून पाठींबा द्यायचा आणि राष्ट्रवादीनेही सत्तेत जाऊन वा बाहेर राहून शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेत बसवावे, अशी समिकरणे जुळवली जात असल्याचे ऐकू येते आहे. त्याला कुठूनही दुजोरा मिळालेला नसला, तरी तसे होणारच नाही, अशी खात्री कोणी देऊ शकत नाही. कारण आता भाजपाला सत्तेपासून दूर राखणे वा भाजपाचे नाक कापणे; यासाठी वाटेल ते करण्याला कॉग्रेस रणनिती मानू लागली आहे. त्यामुळे असे होणारच नाही, असे ठामपणे म्हणता येत नाही. गेल्या वर्षी अनेक राज्यात भाजपा पराभूत होताना कॉग्रेसचेही नामोनिशाण पुसले गेले. तेव्हा मणिशंकर अय्यर नावाचा बुद्धीमान कॉग्रेसनेता म्हणाला होता, विषय कॉग्रेसला सत्तेवर आणण्याचा नसून भाजपाला पराभूत करण्याचा आहे. त्यातून कॉग्रेसी पराभवाची मिमांसा होऊ शकते. त्या पक्षाला आता जिंकण्याची उमेद राहिलेली नसून, भाजपाचे नुकसान हे ध्येय झाले आहे.

गेल्या कित्येक वर्षात कॉग्रेस अशीच एकेक राज्यातून नामशेष झाली. पण त्याची दुसरीही बाजू आहे. ज्यांनी कोणी असे डावपेच खेळण्यात कॉग्रेसला मदत केली, त्यांचा पुढल्या काळात बोर्‍या वाजत गेला. हेही विसरता कामा नये. १९९९ सालात सेना-भाजपा युतीला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी दोन्ही कॉग्रेस वगळता उरलेल्या सेक्युलर पक्षांनी पुरोगामी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला. नंतरच्या पंधरा वर्षात तेच पक्ष नामशेष होऊन गेले. सेना वा भाजपाची वाढ त्यांना रोखता आलेली नव्हती. आता त्यापैकी शेकाप वगळता कोणाचे नामोनिशाण विधानसभेत नाही. आता त्याच सापळ्यात शिवसेनेला अडकण्याचा मोह झाला, तर त्याला विनाशकाले विपरीत बुद्धी असेच म्हणावे लागेल. कारण तो नकारात्मक पवित्रा आहे. भाजपाला अपशकून वा त्याचे नुकसान, हा कुठल्याही दुसर्‍या पक्षा़चा अजेंडा असू शकत नाही. आपला विस्तार करणे वा आपली शक्ती वाढवत नेण्याचाच अजेंडा असू शकतो. तडजोडी वा कारस्थानातून मिळालेली सत्ता फ़ार काळ टिकत नसते. सत्तेचा इतकाच हव्यास असेल तर त्यात शिवसेनाही फ़सू शकते. पण मग तिचा कॉग्रेस विरोधाचा मुखवटा फ़ाटून जाईल आणि भाजपाला मोकाट रान मिळेल. भाजपाशी स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याची कुवत व पात्रता असलेल्यांनी, अशा पळवाटा शोधल्या तर नुकसानाचीच खात्री देता येते. बिहार दिल्लीत भाजपा त्याच मोहात फ़सला होता. अन्य पक्षाचे आमदार गोळा करण्यात भाजपा रमला आणि नितीश वा केजरीवाल निवडणूका जिंकण्यासाठी मतदारापर्यंत जात राहिले. कारण टिकावू सत्ता मिळवण्याचा तोच खात्रीचा मार्ग असतो. ज्यांच्यात लढण्याची व संघर्षातून जिंकण्याची कुवत वा हिंमत नसते, तेच अशा कारस्थानांमागे धावतात आणि आपला कपाळमोक्ष करून घेतात. लढून व मतदारापर्यंत भिडून अधिक संख्या आणण्यात अपेशी झाल्याची भरपाई असल्या कारस्थानाने होऊ शकत नाही.

दिल्लीत केजरीवालनी सत्तापदावर लाथ मारण्याची हिंमत दाखवली होती आणि तीच मतदाराला भावली होती. म्हणून दिड वर्षाने पुन्हा लोकांसमोर जाण्याची वेळ आली, तेव्हा लोकांनी पर्याय म्हणून आम आदमी पक्षाला डोक्यावर घेतले. कॉग्रेसची धुळधाण झालीच. पण भाजपाचेही लोकसभेतील यश त्यात धुतले गेले. बिहारमध्ये नितीश या बलदंड नेत्याने परिस्थिती ओळखून लालूंशी हातमिळवणी केली व निवडणूकपुर्व युती कॉग्रेससोबत केली होती. मतांच्या टक्केवारीचे गणित मांडून असे गठबंधन तयार करताना, नितीशनी त्यागाचीही हिंमत दाखवली. आपण एकहाती भाजपाला हरवू शकत नसल्याने नितीश यांनी वीस वर्षाचे लालूशी असलेले वैर संपुष्टात आणलेच. पण आपले १२४ आमदार असताना २४ जागांवर पाणी सोडून अवघ्या १०० जागाच पत्करल्या होत्या. त्यातून लालू व कॉग्रेसचा राजकीय लाभ झाला. पण मोदीलाट रोखण्याचे श्रेय नितीश यांना मिळाले व भाजपाला सणसणित धडा मिळालेला होता. त्यामुळेच राजकारणाची लढाई लढताना भावना व पुर्वग्रह बाजूला ठेवून जनमानस गंभीरपणे विचारात घ्यावे लागते. मुंबई महाराष्ट्रातील शिवसेनेचा विस्तार व यश हे बिगरकॉग्रेसी राजकारणावर पोसलेले आहे. अशा स्थितीत कॉग्रेसशी हातमिळवणी सेनेला पुढल्या काळात महाग पडू शकते. असल्या कारस्थानी गोष्टी कथाकादंबर्‍यात झकास वाटतात. जनमानसात त्या गळी मारताना तारांबळ उडत असते. म्हणूनच मुंबईचा महापौर मिळवताना किंवा राज्यातला भाजपा विरोधी पर्याय उभा करताना, भविष्याचा विचार सोडून चालणार नाही. त्यातली नकारात्मकता कुठेही घेऊन जाणारी नाही. राष्ट्रवादी वा कॉग्रेस यांचा मतदार पाठीराखा भाजपाच्या विरोधात आपल्या गोटात आणण्याची हिंमत, उमेद वा महत्वाकांक्षा बाळगून तितकी मेहनत घेण्य़ाची धमक शिवसेनेत असेल, तर मात्र असा केजरी जुगार जरूर खेळावा.