जळगाव । बहुचर्चीत केटामाईनप्रकरणी दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले मटेरिअल शनिवारी जिल्हा न्यायालयात पंचासमक्ष हजर करण्यात आले. नंतर सील उघडून न्यायालयाने मुद्देमालाची पाहणी केली. केटामाईनप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून खटल्याचे कामकाज न्यायालयात सुरू आहे. पथकाने फॅक्टरीमधून जप्त केलेले केटामाईनसह कच्चे मटेरिअल भुसावळ खडका रोडवरील सेंट्रल एक्साईज गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते. हा मुद्देमाल शनिवारी कोर्टात हजर करावयाचा असल्याने शुक्रवारी येथून कोर्ट चौकशी अधिकारी गोडाऊनवर गेले होते. पंचांना हे गोडाऊन दाखविण्यात आले. पंच प्रल्हाद महाजन यांच्या समक्ष कोर्टाने संपूर्ण पाहणी केली. नंतर जप्त केलेल्या 47 गोण्या वाहनामध्ये भरण्यात येऊन सील करण्यात आल्यात. तत्पूर्वी पंच महाजन यांची घटनास्थळी उलटतपासणी ड. हिंमत सूर्यवंशी यांनी घेतली. यावेळी ड. राशीद पिंजारी, ड. प्रवीण पांडे हे संशयितांचे वकील उपस्थित होते. दरम्यान, आज केटामाईनचे वाहन न्यायालयात दाखल झाले. या गुन्ह्यातील सर्व संशयित न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात असून त्या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. के.बी. अग्रवाल यांनी वाहनाजवळ आल्यावर पंचासमक्ष वाहनाचे सील उघडण्यात आले. शुक्रवारी करण्यात आलेला पंचनामा पाहून जप्तीचा क्रमांक सांगण्यात आला. यावेळी पंचांची सरतपासणी सरकारी वकील अॅड.सरपांडे यांनी घेतली.