केटी वेअर बंधार्‍यावरून तोल गेल्याने जुने सांगवी येथील 28 वर्षीय युवकाचा मृत्यू

शिरपूर:तालुक्यातील जुने सांगवी येथे अरुणावती नदी पात्रात केटी वेअर बंधार्‍यावरून चालतांना तोल गेल्याने खाली पडून एका 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, 9 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. शामलाल लकड्या पावरा (वय 28, रा.जुने सांगवी, ता.शिरपूर) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

सविस्तर असे, शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील शामलाल लकड्या पावरा हा गावाजवळ अरुणावती नदीपात्रात असलेल्या केटी वेअर बंधार्‍यावरून 9 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपुर्वी दारूच्या नशेत चालत जात असताना तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जुने सांगवी येथील राजाराम संपत पावरा यांनी सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास तालुका पोलिसांकडून सुरु आहे.