डोंबिवली – केडीएमटीच्या ५७० कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याचा पगार मिळालेला नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिवहन सेवा सुरू होऊन २० वर्षे उलटल्यानंतरही केडीएमटीला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही महापालिकेच्या उत्पन्नावरच अवलंबून रहावे लागत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. कल्याण व डोंबिवलीकर येथील रिक्षाचालकांच्या सुमार सेवेला केव्हाच कंटाळले आहेत. परंतु पालिकेची परिवहन सेवा त्याहून वाईट दर्जाची असल्याने त्यांना या रिक्षांशिवाय पर्याय नाही.
हे देखील वाचा
सध्या केडीएमटीच्या ताफ्यात ८० बसेस आहेत. अंदाजे ५० हजार प्रववाशांकडून केडीएमटीला महिन्याला १ कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये १० एसी बसेसचा मोठा हातभार लागतो. दिवसाला ८० हजार रुपयांचे उत्पन्न केवळ या एसी बसेसमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून मिळते. एकीकडे उत्पन्नवाढीला मर्यादा असताना, परिवहन उपक्रमाचा मासिक खर्च ३ कोटी रुपयांवर झेपावला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही केडीएमसीकडे हात पसरण्यापेक्षा अन्य पर्याय परिवहनकडे नाही. दर महिन्याला २० तारखेच्या सुमारास या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. परंतु मार्च महिन्याचा पगार अद्याप न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.याबाबत परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याकडे विचारणा केली असता, गुरुवारीच पालिकेकडून अनुदानाचा चेक मिळाला असून तातडीने कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील, असे त्यांनी सांगितले.
तर दुसरीकडे दिवा शहरात ठाणे महापालिकेची बस सेवा सुरु झाली.
दिव्यातील नागरिकांना आतापर्यंत रेल्वेने वाहतूक करण्याशिवाय पर्यायच नव्हता. मात्र आता दिवावासीयांना हक्काची बस मिळाली असून ठाणे महानगरपालिकेने मंगळवारपासून या ठिकाणी बस सेवा सुरु केली आहे. उपमहापौर रमाकांत मढवी हे दिवा विभागातील असून त्यांनी ही बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले.बसचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.