कल्याण । कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन (केडीएमटी) कर्मचार्यांच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी महापालिका पदाधिकारी आणि अधिकार्यांची कृती समिती नेमण्याचे आश्वासन आज महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला दिले. दिले. त्याचबरोबर केडीएमटी कर्मचार्यांच्या वेतनाचा प्रश्नदेखील त्वरित मार्गी लावण्याचे आयुक्तांनी सूचित केल्याने परिवहन कर्मचार्यांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन यशस्वी झाले. केडीएमटी कर्मचार्यांचा दोन महिन्याचा थकीत पगार, 2017 मधील सार्वजनिक सुट्ट्या व मागील फरकाची रक्कम कामगारांना त्वरित देण्यात यावी या मागण्यांसाठी परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दुपारी 12 वाजल्यापासून परिवहनच्या गणेशघाट आगार येथे कर्मचार्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले. धडक कामगार युनियनचे स्थानिक पदाधिकारीदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. शेकडो कर्मचार्यांनी चक्काजाम आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केडीएमटीच्या बसेस ठिकठिकाणी बंद करण्यात आल्याचे दिसत होते.
कर्मचार्यांच्या आग्रहावरून धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणे यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत कर्मचार्याच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी गणेशघाट आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ कर्मचार्यांशी संवाद साधताना अभिजित राणे यांनी परिवहनच्या सध्याच्या परिस्थितीला परिवहन उपक्रम आणि महापालिका प्रशासनातील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचे सांगत परिवहनच्या कामगारांच्या प्रश्नांबाबत धडक कामगार युनियनचे साडेपाच लाख कामगारदेखील केडीएमटीच्या कामगारांसोबत उभे ठाकतील, असा शब्द यावेळी उपस्थित कर्मचार्यांना दिला. याप्रकरणी आपण महापालिका आयुक्तांची भेट घेऊ ते सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अरविंद मोरे यांचेही भाषण झाले. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत गायकवाड, धडक कामगार युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कदम, कोणार्क देसाई, जयस्वाल आदींसह शेकडो कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मान्यताप्राप्त संघटना बिनकामाची
यावेळी अभिजित राणे, अरविंद मोरे यांच्यासह कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त वेलरासू यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी परिवहन कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दाखवत कर्मचार्यांचे एक महिन्याचे वेतन त्वरित अदा करण्यात येईल, असे सांगितले. उर्वरित मागण्या सोडवण्यासाठी 15 दिवसांत महापौर, स्थायी समितीचे सभापती व संबंधित अधिकार्यांची एक कृती समिती गठित करण्यात येऊन कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन वेलरासू यांनी यावेळी दिले. मान्यताप्राप्त युनियन कोणत्याही प्रकारचे काम करत नसल्याने आम्हाला केडीएमटीच्या कामगारांच्या मागण्यासाठी आज आंदोलन करावे लागल्याचे अरविंद मोरे यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. त्याचप्रमाणे परिवहन प्रशासनाने 12 महिन्यांचे बजेट 10 महिन्यांतच संपवले. प्रशासनात समन्वय नसल्याने कामगारांचे हाल होत असल्याचेही मोरे यांनी अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
दहावीच्या परीक्षेवर चक्काजामचा परिणाम नाही
दहावीचे पेपर सुरू असल्याने 12 वाजेपर्यंत केडीएमटीची बस सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत कर्मचार्यांनी आंदोलन तीव्र केले. दुपारी 1 ते 4 दरम्यान केडीएमटी जवळपास ठप्प झाली होती. महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याने 4 वाजल्यापासून बससेवा पूर्ववत सुरू झाली.