कल्याण : शहरातील रस्त्यांच्या कामांसह अनेक तांत्रिक कामे अपुर्या कर्मचार्यांअभावी रखडली असतानाच इतर कर्मचार्यांबरोबर तांत्रिक कर्मचार्यांना मीरा-भाईदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे तांत्रिक कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या निवेदनात अभियंत्यांनी खड्डे बुजविण्यासह इतर कामे रखडल्यास त्याला तांत्रिक विभाग जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या 20 ऑगस्ट रोजी मीरा- भाईदर महापालिकेच्या निवडणुका असून या निवडणुकीच्या कामासाठी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील 450 कर्मचार्यांना जुंपण्यात आले आहे. या कर्मचार्यांनी या ड्युट्या नाकारल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. यामुळे या कर्मचार्यांना या ड्युट्या नाकारता येणार नाहीत.
मनुष्यबळाअभावी काम आधिक
पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून महानगरपालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्याबरोबरच नव्या रस्त्याचे रुंदीकरण आणि खोदलेल्या रस्त्याची कामे तसेच इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या विस्तीर्ण परिसरातील तांत्रिक कामे करण्यासाठी केवळ 72 अभियंते कार्यरत असून ही संख्या अपुरी असल्यामुळे एका अभियंत्याकडे एकापेक्षा जास्त पदभार सोपविण्यात आला आहे.
कामांवर परिणाम होणार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असताना दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हे कर्मचारी प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक आहे. मात्र या कर्मचार्यांना निवडणूक ड्युटीसाठी मीरा-भाईंदर पालिकेत उपस्थित राहावे लागणार असल्यामुळे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास त्याला तांत्रिक कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचे या कर्मचार्यांनी स्पष्ट केले आहे. त्या आशयाचे निवेदन पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांना दिले आहे.
निवडणूक ड्युटी हे शासकीय काम असल्यामुळे कर्मचार्यांना नेमून दिलेले काम करावेच लागणार आहे. पालिकेत एकूण 72 तांत्रिक कर्मचारी असून यातील 15 कर्मचार्यांना निवडणूक ड्युट्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून या ड्युट्यामुळे नेमून दिलेल्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता असल्याचे निवेदन दिले आहे.
– विजय पगार, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग