नंदुरबार। गोरक्षणाच्या कार्यातून नंदुरबार जिल्ह्याला बहुपरिचित झालेले धडाडीचे तरूण कार्यकर्ते केतन रघुवंशी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमधे प्रवेश केला. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेला कट्टर हिंदुप्रेमी चेहेरा लाभला, असे शहरात बोलले जावू लागले आहे. 15 ऑगस्ट रोजी आमदार मा.डॉ. विजयकुमारजी गावित यांच्या वाढदिवस सोहळ्याप्रसंगी केतन रघुवंशी आणि शंभरहून अधिक कार्यकत्यांनी वाजतगाजत मिरवणुकीने येऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची ही औपचारिकता पार पडली.
प्रत्येकापर्यंत पक्षाचे विकासधोरण पोहचविणार
यावेळी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षा डॉ.हिना गावित यांनी तसेच आमदार डॉ. विजयकुमारजी गावित यांनी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन प्रतिकात्मक स्वागत केले. ज्येष्ठ कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस कांतिलाल टाटीया, शहरप्रमुख मोहन खानवाणी, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा कुमूदिनीजी गावित आणि अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. जिल्हाध्यक्षा खा.डॉ.हिना गावित यांनी सर्वांचे भाजपाच्यावतीने स्वागत केले आणि प्रत्येक माणसापर्यंत पक्षाचे विकास धोरण पोहचवणारे कार्य अपेक्षीत असल्याचे सांगितले. सर्वांच्या सहकार्याने शहरात पक्षसंघटन मजबूत करू तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना अपेक्षीत असे कार्य करून दाखवू, असे केतन रघुवंशी यांनी याप्रसंगी सांगितले. दरम्यान,जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून केतन रघुवंशी यांच्यावर भाजपात प्रवेश घेतल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.