केबल ग्राहकांचा तोटा न होण्यासाठी खासदार खडसेंचे माहिती प्रसारण राज्यमंत्र्यांना निवेदन

0

भुसावळ- टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) लागू केलेल्या केबलच्या नव्या नियमानुसार जे ग्राहक जुन्या दरानुसार महिना 200 ते 300 रुपयात जवळपास सर्व चॅनेलचा लाभ घेत होते. त्यांना नवीन दरानुसार एक हजारांपर्यंत खर्च लागण्याची भीती असून या नव्या दरामुळे केबल क्षेत्रातील मध्यम आणि लहान केबल चालकांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागण्याची भीती असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणार्‍या करोडो लोकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळणार असून याबाबत तोडगा काढण्याची मागणी खासदार रक्षा खडसेंनी माहिती राज्य प्रसारण मंत्र्यांकडे केली.

केबल ऑपरेटरसह ग्राहकांनाही बसेल फटका
29 डिसेंबरपासून सध्या सुरू असलेले चॅनल्सचे पॅकेज बंद होत नव्या नियमांच्या आधारे नवे पॅकेज सुरू होतील. यात शहर-ग्रामीण असा कुठलाही फरक न ठेवता सर्वांना सरसकट हे दर लागू करण्यात आले असून या वाढलेल्या दरांचा बोजा ग्राहकांच्या माथी पडणार आहे.ट्रायने ही दर आकारणी केबल ग्राहकांच्या हितासाठी केली असेल तर केबल ग्राहकांकडून अधिक पैसे घेऊन ही आकारणी केबल ग्राहकांच्या हिताची ठरणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या मुद्यांचा विचार ट्रायने करून ही नवीन दर आकारणी ठरवावी, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे. यावर सूचना व माहिती प्रसारण राज्य मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांनी या मुद्यांवरचर्चा करण्यासाठी ट्रायसोबत एक तातडीची बैठक बोलावली आहे.