केरन पोलार्डबद्दल ‘ते’ वक्तव्य केलेच नाही!

0

मुंबई। आयपीएलच्या कुंभमेळ्यात रोज काहीतरी नवे किस्से ऐकायला मिळत असतात. आयपीएल आणि वाद हे देखील नवीन नाही. क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू केरन पोलार्ड यांच्यात आता नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. मात्र मी कधीही पोलार्डला अक्कलशून्य म्हणालो नाही असे मांजरेकर यांनी समालोचन करताना केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अक्कलशून्य किंवा डोकं नाही असे शब्द मी वापरत नाही, मी टीकाकार आहे पण कोणाचा अपमान करू शकत नाही. पोलार्ड प्रकरणावरून माझ्यावर टीका करणा-यांनी व्हिडीओ फूटेज पाहावे असे ट्वीट मांजरेकरांनी केले आहे.

पोलार्डने संतापात केले होते ट्वीट
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पोलार्ड बाद झाल्यानंतर मांजरेकर यांनी पोलार्डबद्धल काही टिप्पणी केली. यावर पोलार्ड चांगलाच संतापला. त्याने मांजरेकरांच्या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सुरू होता. सामन्यादरम्यान, मांजरेकर समालोचन करत होते. ऐन वेळी पोलार्ड बाद झाला हे पाहून, मांजरेकरांनी पोलार्डवर टीका केली. सहकारी समालोचकाने मांजरेकर यांना पोलार्डसाठी फलंदाजीचे आदर्श स्थान कोणते, असा प्रश्न केला. त्यावर पोलार्ड डावाच्या शेवटी सहा किंवा सात षटकांत फलंदाजी करण्यासाठी योग्य असल्याचे मत मांजरेकरांनी व्यक्त केले. मांजरेकरांच्या मतावर प्रतिक्रीया देताना आपल्या ट्विटमध्ये पोलार्ड म्हणतो, बोलण्यासाठी पैसा मिळतो म्हणून मांजरेकर तुम्ही काहीही बरळण्यास मोकळे आहात का? तुम्ही भो-भो करणे सुरू ठेवू शकता. मला इतका पैसा का मिळतो, हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मी इतका पैसा मिळविण्याचा हकदार आहे, अशा शब्दांत मांजरेकरांना प्रतिक्रीया देतानाच शब्दात मोठी ताकद असते. एकदा शब्द बाहेर पडले की परत घेता येत नाहीत. शब्द जरा जपून वापरा, असा सल्लाही पोलार्डने मांजरेकरांना दिला होता.