तिरूअंतपूरम : केरळमध्ये मुसळधार पावसाचा जोर आता हळूहळू कमी झाल्यामुळे सरकारने रेड अलर्टची सूचना मागे घेतली आहे. नागरिकांचे पुर्नवसन सुरू झाले आहे. मात्र केरळमध्ये आलेल्या या महाप्रलयामध्ये आतापर्यंत जवळपास ३५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे.गेल्या १०० वर्षातील केरळमध्ये पडलेला हा सर्वात मोठा पाऊस आणि पूरग्रस्त स्थिती आली आहे.
या महाप्रलयांमध्ये सर्वात मोठे नुकसान व हाल सर्वसामान्य लोकांचे झाले आहे. ३५७ जणांचा बळी गेला. दहा लाख ७८ हजार नागरिक बेघर झाले आहेत. बेघर झालेल्या लोकांना ५,६५० सुरशित ठिकाणी हलवण्यात आले आहे. राज्यातील ४० हजार हेक्टर पिकांची नासधूस झाली तर २६ हजार घरे जमीनदोस्त झाली आहे. राज्यातील एक लाख किलोमीटर रस्ते खराब झाले आहेत. तर १३४ पूल खराब झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. केरळमध्ये येणाऱ्या पर्यटकांनी आपली सर्व बुकींग रद्द केली आहे. त्यामुळे या क्षेत्राला सर्वात मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या जीडीपीमध्ये पर्यटन विभागाचा १/१० टक्के वाटा असतो.
पर्यटनाशिवाय चहा, कॉफी, इलाईची आणि शेतीमुळे राज्यला दहा टक्के जीडीपी येतो. शेतीच्या नुकसानामुळे आता राज्याला मिळणाऱ्या उत्पन्न कमी होणार आहे. शेतीच्या क्षेत्राला तब्बल ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. रस्ते खराब झाल्यामुळे १३,००० कोटींचे तर पूल तुटल्यामुळे ८०० कोटींचे नुकसान झाले आहे.त्यामुळे आता यामधून सावरण्यासाठी पर्यटन विभागाला आणि राज्याला बराच वेळ लागणार आहे.