केरळमधील आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

 लाखांचे मका खरेदी फसवणूक प्रकरण ; न्यायालयाने सुनावली कोठडी

भुसावळ- सुमारे 40 लाख रुपये किंमतीचा मका खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट अदा न करणार्‍या केरळातील व्यापार्‍यांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयीन तारखेवर सातत्याने गैरहजर राहणार्‍या आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या तर आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
40 लाखांची मका खरेदी, पेमेंट देण्यास टाळाटाळ
शहरातील ससा ट्रेडींग कंपनीचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांच्याकडून हितेंद्र ठक्कर ( मुलूंड, मुंबई) व केरळमधील वेदांत एक्सपोर्टचे संचालक तथा डॉ.नारायणन वासुदेवन (कुथाला, प्रवरा, जि.कन्नूर, केरळ) यांनी 39 लाख 22 हजार 515 रुपये किंमतीचा मका खरेदी केला होता मात्र आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. न्यायालयीन खटल्याच्या तारखेस संशयीत गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे उपनिरीक्षक निशीकांत जोशी, बंटी सैंदाणे, विजय पाटील, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण यांनी पेलाउर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.