केरळमधील संघ कार्यालयाची तोडफोड

0

कन्नूर । कन्नूर जिल्ह्यातील पेरुंथत्तील गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. ही तोडफोड मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप संघासह भारतीय जनता पक्षाने केला आहे. पेरुंथत्तील गावातील संघाच्या कार्यालयात सोमवारी सकाळी दहा जणांनी प्रवेश केला. त्यांनी खिडक्या तोडल्या आणि कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी कार्यालयात असलेल्या एका महिलेला आणि बालकाला धमकावण्यात आले. विशेष म्हणजे रविवारीच या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. रा. स्व. संघाचे दिल्लीतील प्रांत प्रचार प्रमुख राजीव तुली यांनी या प्रकाराबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यातून संघाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. माकपचे वर्चस्व असलेल्या परिसरात रा. स्व. संघाने ‘केशव स्मृती सेवालय’ नावाने सुरू केलेल्या कार्यालयावर हल्ला झाला. या कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभापासून आजपर्यंत तब्बल 18 वेळा हल्ला झाला आहे. पेरुंथत्तील गावात ‘सीपीएम पक्षाच्या गावात आपले स्वागत आहे, हा संघमुक्त परिसर आहे, येथे संघाला बंदी आहे’, असे पोस्टर लावण्यात आल्याचे तुली यांनी सांगितले.