केरळमध्ये आरएसएस पदाधिकार्‍याची हत्या

0

तिरुवनंतपुरम् । केरळमध्ये भाजप, संघ आणि माकप कार्यकर्त्यांमधील वाद अजूनही शमलेला दिसत नाही. शुक्रवारी रात्री उशिरा कन्नूर येथे संघाच्या एका पदाधिकार्‍याची निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपने कन्नूरमध्ये सैन्यदलाला देण्यात येणार्‍या अफ्सा कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. तर राज्यपाल पी. सदाशिवन यांनी मुख्यमंत्री विजयन यांना गुन्हेगारांवर तातडीने कारवाई केली जावी, असे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री विजयन यांनी अफ्सा लागू करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

कन्नूर येथील संघाचे पदाधिकारी बीजू यांची पयनूर येथे हत्या करण्यात आली होती. या भागामध्ये आरएसएस आणि संघामध्ये सातत्याने हिंसक वाद सुरू असतात. या हत्येला सत्ताधारी माकपचे कार्यकर्ते जबाबदार असून पोलिसांचीही त्यांना साथ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, माकपने याचा इन्कार केला आहे. या घटनेमुळे कन्नूर परिसरामध्ये प्रचंड तणाव असून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. राज्यातील भाजपचे एकमेव आमदार ओ. राजगोपाल व पक्षाच्या अन्य नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या भेटीला गेले होते. त्यांनी कन्नूर परिसरामध्ये माकप कार्यकर्त्यांचे थैमान सुरू असून भाजप, आरएसएस कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या हत्या होत असल्याचा आरोप केला आहे. पोलीस आणि माकप कार्यकर्त्यांची एक वेगळीच संघटना बनली आहे. या अभद्र युतीमुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात आल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात शांतता निर्माण होण्यासाठी येथे अफ्सा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तर राज्यपाल पी. सदाशिवम यांनी या घटनेबाबत सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत. गुन्हेगारांना अटक करावी, असे आदेश सरकारला दिले आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी सातजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चार लोकांच्या टोळक्याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. बीजू आणि त्याचे मित्र दुचाकीवरून जात असताना इनोव्हा कारने त्यांना धडक दिली. ते खाली पडल्यावर गाडीतील चौघांनी त्यांची अतिशय निर्दयपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. बीजू यांच्यावर 2016 च्या जुलैमध्ये एका माकप कार्यकर्त्याचा खून केल्याचा आरोप आहे. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.