तिरुअनंतपुरम-केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. यामध्ये अनेकांचे जीव गेले असून असंख्य लोक बेघर झाले आहेत. जगभरातून केरळसाठी मदतीचा ओघ सुरु असताना त्यामध्ये आता आणखी एक मोठी भर पडली आहे. ‘अॅपल’ या अमेरिकन कंपनीने केरळमधील पूरग्रस्तांना ७ कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय मायक्रोसॉफ्टचे संस्थापक असलेल्या बिल गेट्स यांच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे केरळमधील नागरिकांना ४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
घरे, शाळा यांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हा निधी देण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले. इतकेच नाही तर अॅपलने आपले होम पेज आणि अॅपस्टोअर आणि आयट्यून स्टोअर याठीकाणी ग्राहकांना केरळवासीयांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. अॅपलचे ग्राहक डेबिट आणि क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ५, १०, २५, ५०, १०० आणि २०० डॉलरची मदत करु शकतात.
आतापर्यंत राज्याचे जवळपास २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व नुकसान भरुन काढण्यासाठी बराच कालावधी आणि निधीची आवश्यकता असून येथील जीवन पूर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागेल सांगता येत नाही.