खुनाचे कारण गुलदस्त्यात ः डोक्यासह गळा व छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार
रावेर– चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या रावेर तालुक्यातील केर्हाळा खुर्द येथील दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मजूर महिलांचा नेमका कुणी व कोणत्या कारणाने खून केला? याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. नसीबा रुबाब तडवी (50) व शालूबाई गौतम तायडे (55) अशी मृत महिलांची नावे आहेत. दरम्यान, खुनाचा उलगडा करण्याचे आव्हान रावेर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी खून
तालुक्यातील केर्हाळा खुर्द येथील नसीबा रुबाब तडवी (50) व शालूबाई गौतम तायडे (55) या दोन्ही मजूर महिला सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास म्हशी व बकर्यारसाठी चारा आणण्यासाठी गेल्या. मात्र रात्र होऊनही त्या दोन्ही घरी न परतल्याने त्यांचा शोध घरच्या लोकांकडून केर्हाळा व परिसरातील शेत शिवारात सुरू करण्यात आला. मात्र दुसर्या दिवसापर्यंतही शोध न लागल्याने पुन्हा शेत-शिवारात शोध मोहिम सकाळपासून दोन्ही महिलांच्या कुटुंबियांकडून व गावातील युवकांकडून राबवली जात असताना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास खेडी शिवारात मजूर महिला नसीमा यांचा मृतदेह केर्हाळा बुद्रुक येथील नारायण रामचंद्र पाटील यांच्या तुरीच्या शेतात तर शालूबाईचा मृतदेह केर्हाळा खुर्द येथील विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच्या शेतात आढळला. दोघा महिलांचे मृतदेह 20 ते 25 फूट अंतरावर आढळले. मयतांच्या डोक्यावर, गळ्यावर तसेच छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची धाव
खेडी शिवारात अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, सुनील कदम, पोलीस कर्मचारी निलेश चौधरी, अजय खंडेराव, सतीष सानप, भागवत धांडे, विजय जावरे, विकास पहुरकर आदी पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले. सायंकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले.
दोघा महिलांचे मृतदेह पाहताच मुले बेशुद्ध
ग्रामस्थांच्या मदतीने दोघा महिलांचा शोध सुरू असतानाच शेतात महिलांचे मृतदेह पाहताच संजय तायडे व संजु तडवी जागेवर शेतातच बेशुध्द होवून खाली पडले. लगेच सहकार्यांनी त्यांना उचलून गावातील दवाखान्यात आणल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
शेतात आढळले दोघांचे मृतदेह
मयत नसीबा तडवी (45) व शालूबाई तडवी (50) या सोमवार, 18 रोजी सकाळी 11 वाजता चारा घेण्यासाठी शेतात गेल्या होत्या मात्र सायंकाळ होवूनही दोघे घरी न परतल्याने त्यांच्या मुलांनी शोधाशोध केली मात्र शोध न लागल्याने रावेर पोलीस स्थानकात मंगळवारी दोघे महिला हरवल्याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. मंगळवारी दुपारी खेडी शिवारात दोघांचे मृतदेह सुमारे 20 ते 25 फुटांच्या अंतरावर तुरी व कपाशीच्या शेतात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
सरपंचासह ग्रामस्थ पोहोचले घटनास्थळी
खुनाची वार्ता केर्हाळा गावात कळताच खेडी शिवारातील खून झालेल्या घटनास्थळीच्या शेतामध्ये माजी पंचायत समिती उपसभापती महेश पाटील, केर्हाळा बु.॥ सरपंच राहुल पाटील, केर्हाळा खुर्दचे सरपंच कुर्बान तडवी, माजी सरपंच विशाल पाटील, धनलाल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली.