अन्य पुरुषांशी असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयातून आरोपींनी खून केल्याची पोलिसांना दिली कबुली: आठ तासात खुनाचा उलगडा
रावेर : चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या रावेर तालुक्यातील केर्हाळा खुर्द येथील दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अवघ्या आठ तासात पोलिसांनी तपासचक्र फिरवत खुनाचा उलगडा केला असून दोघा आरोपींना अटक केली आहे. कैलास गुना गाढे (57) व लक्ष्मण किसन निकम (60, रा.केर्हाळा खुर्द) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी मयतांशी अनैतिक संबंध असल्याची कबुली देत मयतांचे आणखी काहींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांचा काटा काढल्याची कबुली पोलिस तपासात दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दोघा मजूर महिलांचा एकाच वेळी खून
तालुक्यातील केर्हाळा खुर्द येथील नसीबा रुबाब तडवी (50) व शालूबाई गौतम तायडे (55) या दोन्ही मजूर महिला सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास म्हशी व बकर्यांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या मात्र रात्र होऊनही त्या दोन्ही घरी न परतल्याने त्यांचा शोध घरच्या लोकांकडून केर्हाव परीसरातील शेत शिवारात सुरू करण्यात आला मात्र दुसर्या दिवसापर्यंतही शोध न लागल्याने पुन्हा शेत-शिवारात शोध मोहिम सकाळपासून दोन्ही महिलांच्या कुटुंबियांकडून व गावातील युवकांकडून राबवली जात असताना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास खेडी शिवारात मजूर महिला नसीमा यांचा मृतदेह केर्हाळा बुद्रुक येथील नारायण रामचंद्र पाटील यांच्या तुरीच्या शेतात तर शालूबाईचा मृतदेह केर्हाळा खुर्द येथील विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच्या शेतात आढळले होते.
पोलीस अधीक्षकांचा रावेरमध्ये तळ
मंगळवारी उघडकीस आलेल्या खुनाच्या घटनेनंतर मृतदेह जळगावी शवविच्छेदनासाठी हलवल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले रावेरमध्ये तळ ठोकुन होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी तपासचक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे दोघांच्या मुसक्या आवळल्या.
गळा आवळून व चाकूने वार करून केला खून
सोमवार, 18 रोजी दोघे महिला चारा घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या तर दोघा आरोपींनी त्यांच्याशी मोबाईलवर संवाद साधून त्यांचा ठावठिकाणा विचारात खेडी शेत-शिवार गाठले. दोघांनी महिलांशी प्रेमसंबंध ठेवल्यानंतर संशयीत आरोपी कैलास गाढेने नसीबी तडवीचा फवारणी पंपाच्या पट्ट्याने गळा आवळला तर लक्ष्मण निकमने तिच्या गळ्यावर व शरीरावर चाकूने वार करीत तिला ठार केले तर संशयीत आरोपी लक्ष्मणन निकम शालुबाई हिच्या गळ्यावर चाकूने भोसकून जीवे मारले. आरोपींच्या अटकेनंतर या घटनेचा उलगडा झाला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम तसेच रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, सुनील कदम, पोलिस कर्मचारी जितेंद्र पाटील, निलेश चौधरी, अजय खंडेराव, सतीष सानप, भागवत धांडे, विजय जावरे, विकास पहुरकर आदींनी गुन्ह्याचा उलगडा केला.
खुनाआधी महिलांशी शारीरिक संबंध
संशयीत आरोपी कैलास गुना गाढे (57) व लक्ष्मण किसन निकम (60, केर्हाळा खुर्द) यांचे गावातील नशीशबा रुबाब तडवी (46) व शालुबाई गौतम तायडे (57) यांच्याशी अनैतिक संबंध होते मात्र दोन्ही या संबंधात प्रामाणिक राहत नसून त्या अन्य पुरुषांशीही अनैतिक संबंध ठेवत असाव्यात या संशयातून त्याचा आरोपींना राग होता. दोघे महिला सोमवारी खेडी शिवार जंगलातील विठ्ठल नारायण सोनवणे यांच्या तुरीच्या शेताचे व त्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या नारायण रामचंद्र पाटील यांच्या शेतात चार्याच्या नावाखाली कपाशी चोरण्यासाठी आल्याची माहिती आरोपींना कळाल्यानंतर त्यांनी संगनमत करीत शेत गाठले. दोघांनी महिलांचा खून करण्याआधी त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले व नंतर त्यांची गळा दाबून व चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. रावेर पोलिसांनी बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी संजय गौतम तायडे (35) याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा आरोपींविरुद्ध भाग-5 गुरनं.187/2019 भादंवि कलम 302 वाढीव कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.