केळीसह खरीपातील पिके आडवी

0

यावल । ‘दैव देते अन कर्म नेते’ या उक्तीचा प्रत्यय यावल तालुक्यातील शेतकर्‍यांना बुधवारी व गुरुवारी आलेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे आला असून तब्बल 900 हेक्टरावरील कापणी योग्य केळीसह कापूस, मका, ज्वारीची पिके आडवी झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. माय, बाप सरकारने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबत आता तातडीने भरपाई देण्याची व्यवस्था करावी, अशी आर्त हाक या परीसरातील शेतकर्‍यांनी दिली आहे.

या भागात सर्वाधिक फटका
यावल लालुक्यातील निमगाव टेंबी, दगडी मनवेल, शिरसाड यास यावल शिवारात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्‍यासह पावसामुळे सुमारे 900 हेक्टरावरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेेतकर्‍यांची कापणी योग्य केळी बाग या वेगवान वार्‍यामुळे 80 टक्के झाडे जमीनदोस्त झाली आहे. यावलचे मंडळाधिकारी ई. व्ही. महाडीक व तलाठी एस. व्ही. सुर्यवंशी यांनी काही अल्पशः भागात जावून पाहणी केली असून तहसीलदार कुंदन हिरे यांनी याबाबतचा पंचनामा जिल्हाधिकारी (टंचाई शाखा) यांच्याकडे पाठवला आहे. यावल शहरातील अरुण बारी या शेतकर्‍याचेदेखील नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास या पावसामुळे शेतकर्‍यांचा हिरावला गेला आहे.

हाता तोंडाशी आलेला घास हिरावला
हाता तोंडाशी आलेला खरीप हंगामाचा घास या पावसाने हिरावून नेला आहे. खरीप हंगामातील कापसाला चांगल्या पैकी बोंड आले होते. वादळी पावसात अनेक शेतकर्‍यांची कापसाची झाडे, बोंड व फांद्या तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले तर ज्वारीचे पीकदेखील शेतात आडवेे पडले आहे. पाऊस थांबल्यावर होणार्‍या पंचनाम्या अंती नुकसानाचा प्राथमिक अंदाज येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तूर्त प्रशासनाने 33 टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे रवाना केला आहे.

दोन वर्षांपुर्वीच्या नुकसानीची भरपाई नाही
यावल शिवारात शेताच्या बांधावरील झाडे कोसळून पिकांवर पडल्यामुळे पिके या झाडांखाली दाबली गेली आहेत. दोन वर्षापूर्वी देखील अशा प्रकारे पिकांचे नुकसान झाले होते. आमदार एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना त्यांनी या भागातील शेतांमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन तत्काळ पंचनामे करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार पंचनामेदेखील करण्यात आले मात्र नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी सांगितले. तसेच ज्या कंपनीकडून शेतकर्‍यांनी केळीचा विमा काढला होता त्या कंपनीकडून देखील विम्याची रक्कम दिली जात नसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला.