केळी उत्पादकांना राज्य शासन लवकरच देणार भरपाई

पालकमंत्री गुलाबराव पाटील : मुक्ताईनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी

मुक्ताईनगर : मुक्ताईनगरासह रावेर तालुक्यात गुरुवार, 27 रोजी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने शेकडो हेक्टरवरील केळी आडवी होवून केळी उत्पादकांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. शनिवार, 29 रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील व अधिकार्‍यांसह शेमळदे उचंदा, मेंधोदे, नायगाव या गावांना भेटी देत तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले तसेच विमा कंपन्यांना देखील लवकरात-लवकर शेतकर्‍यांना भरपाई देण्याचे आदेश दिले तसेच मेंढोळदे गावातील जवळपास 180 घरांचे नुकसान झाल्याने अन्नधान्य नसल्याने प्रांताधिकार्‍यांना तत्काळ ग्रामस्थांना विनाअट स्वस्त धान्य पुरवण्याचे ही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

सर्वाधिक गावाला मेंढोळेदे गावाला
गुरूवार, 27 मे रोजी मुक्ताईनगर तालुक्याला चक्रीवादळासह जोरदार पावसाने तडाखा दिल्याने तालुक्यातील 10 ते 15 गावांना याचा फटका बसला.सर्वात जास्त फटका मेंढोळदे गावाला बसला असून तेथील तब्बल 180 घरांवरील पत्रे उडाल्याने ग्रामस्थ उघड्यावर आले आहे शिवाय अनेकांच्या घरावर झाडाच्या फांद्या व झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी तालुक्यात आले होते. दुपारी चार वाजता मेंढोळदे या गावापासून पाहणी करण्यास सुरूवात करण्यात आली. ग्रामस्थांची विचारपूस करत झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा केली. यावेळी महिलांनी अनंत अडचणींचा पाढाच मांडला. मेंढाळदे गाव तापी नदीच्या काठावर असल्याने पुराचा तडाखादेखील दरवर्षी बसत असल्याने व वादळाचा परीणामदेखील गावठाण उंचावर असल्याने बसत असल्याने नागरीकांनी तत्काळ येथील घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी पुनर्वसन विभागाच्या मंत्र्यांची येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना करत पुनर्वसन करण्यासंदर्भातील कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना पालकमंत्र्यांनी दिले. गावातील जवळपास सर्वच घरांवरील छप्पर उडून गेल्याने व घरातील अन्नधान्यांची नासाडी झाल्याने पालकमंत्र्यांनी विना अट ग्रामस्थांना धान्यपुरवठा करण्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना दिले. याप्रसंगी पुनर्वसन विभागाच्या अधिकार्‍यांना देखील तत्काळ पुनर्वसन संदर्भातला अहवाल पाठवण्याची देखील आदेश त्यांनी दिले.

गत काळातील भरपाईचे आदेश
केळी पिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पालकमंत्र्यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरत मागील काळातील विमादेखील न मिळाल्याने या वेळी तरी शेतकर्‍यांना तत्काळ पीक विमा भरपाईची रक्कम देण्याचे आदेश दिले. एव्हढेच नव्हे तर पीक विमा भरलेले शेतकरी व पीक विमा न भरलेले शेतकरी असे वर्गीकरण करून सर्वच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई कशी देता येईल या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच राज्य शासनातर्फे देखील यासंदर्भात मंत्री मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई संदर्भात निर्णय लावण्यात येईल, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, पुनर्वसन विभागाच्या शुभांगी भारदे, तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, अ‍ॅड.मनोहर खैरनार, राजेंद्र हिवराळे, संतोष मराठे, पियुष महाजन, संतोष उर्फ बबलू कोळी, मुकेश वानखेडे, आरीफ आझाद, वसंत भलभले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.