केळी खोडावर मूल्यवर्धित उत्पादन निर्मिती शक्य

0

यावल। ज्या निरुपयोगी केळी खोडाला बांधावर फेकण्यासाठी आधी 3 रूपये खर्च लागत होता, तेच केळीचे खोड आता शेतकर्‍यांना 10 रूपये उत्पन्न मिळवून देत आहे. ही किमया केवळ केळीखोडावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादननिर्मिती प्रकल्पाने शक्य झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. भविष्यात केळीचे उत्पादन घेतल्या जाणार्‍या प्रत्येक ठिकाणी हे प्रकल्प दिसतील, अशी माहिती आमदार हरिभाऊ जावळे यांनी दिली. शेतकरी स्वयंसहाय्य गटाच्या केळीखोडावर प्रक्रिया करणार्‍या लघु उद्योग केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

फूड प्रोसेसिंग युनीट उभारण्याचा मानस
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीरखान अध्यक्षस्थानी, तर पंचायत समितीच्या सभापती संध्या किशोर महाजन, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, तालुका कृषी अधिकारी सी.जे. पाडवी, बाजार समिती संचालक नारायण चौधरी, हर्षल पाटील, विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, डॉ. नरेंद्र कोल्हे, हाजी ताहेर शेख, ताप्ती बनाना सहकारी संस्थेचे व्हाइस चेअरमन डॉ. आर. एम. चौधरी, नगरसेवक राकेश कोलते, परवेज शेख आदी उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना, आमदार जावळेंनी, येत्या दोन वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून यावल-रावेर तालुक्यात मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग युनीट उभारण्याचा मानस व्यक्त केला. यामुळे शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना चालना मिळून रोजगार निर्मितीस मदत होईल. शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले. केळीखोडातील पाण्यापासून तयार केलेल्या द्रवरुप सेंद्रीय खताची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढली आहे. ही मागणी केवळ महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यांतूनच आहे असे नव्हे, तर नायजेरियामधून तब्बल लाख लिटर द्रवरुप खताची मागणी झाल्याचेही जावळेंनी सांगितले.