यावल : यावलचे प्रगतशील शेतकरी किशोर देवराम राणे यांनी बटाईने केलेल्या अट्रावल रस्त्यावरील शेतात बकर्या चारण्यात आल्याने त्यांनी सहा गुरांख्याविरोधात तक्रार दिली होती व या तक्रारीचा राग आल्यानंतर सहा संशयीतांनी राणे यांच्या शेतातील टिश्यूकल्चर जातीचे अडीच हजार केळीचे घड कापून टाकत सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. राजेंद्र काशीनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्निल उर्फ भुरा छगन धनगर, धनराज उर्फ बबलू राजू धनगर, एकनाथ तोताराम भिल, अनिल गंगाराम धनगर (सर्व रा.यावल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बकर्या चारल्याच्या तक्रारीनंतर केले नुकसान
राणे यांनी अट्रावल रस्त्यावर बटाईने केलेल्या शेतात शनिवार, 12 रोजी वरील सहा संशयीत गुराख्यांनी हरभरा पिकात जबरदस्तीने बकर्या चरण्यासाठी घातल्या व शेतकर्याने हटकल्यानंतर राणे यांना मारहाण केली. राणे यांनी या प्रकरणी यावल पोलिसात तक्रार नोंदवली होती व त्याचा राग मनात ठेवून सहा संशयीतांनी केळीचे नुकसान करण्याची धमकी दिली होती व त्यांनी ती खरी करून दाखवत अडीच हजार केळी खोडांचे नुकसान केले. राणे यांनी संशयीतांविरोधात यावल पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.