केळी पिलाचे नुकसान ; चिनावलच्या तिघा महिलांना पोलिसांनी केली अटक

शेतकर्‍याच्या तक्रारीनंतर सावदा पोलिसांची कारवाई : चिनावलच्या तक्रारदार शेतकर्‍याचे दोन हजार रुपयांचे नुकसान

सावदा : सावदासह चिनावल परीसरात केळी पिकांच्या नुकसानीसह शेत मालाच्या नुकसानीमुळे त्रस्त असलेल्या केळी उत्पादकांपुढील संकटे थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. शनिवार, 12 रोजी खिरोदा रस्त्यावरील एका शेतात बकर्‍यांनी केळी पिकांचे नुकसान केल्यानंतर यंत्रणेसह चिनावल पीक संस्थेने लागलीच दखल घेत 16 बकर्‍यांना कारवाईच्या ‘कोंडवाड्यात’ टाकले तर दुसर्‍या घटनेत केळी पिकासाठी राखून ठेवलेले ‘पिल’ कापून शेतकर्‍याचे दोन हजारांचे नुकसान करणार्‍या चिनावलच्या तीन महिलांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सावदा पोलिसांनी तीनही महिलांना अटक केली आहे.

शनिवार ठरला पोलिसांसाठी ‘तक्रारवार’
चिनावलचे केळी उत्पादन टेनचंद बाळकृष्ण नेहते (37) यांचे खिरोदा रस्त्यावरील चिनावल शिवारात गट क्रमांक 758 मध्ये शेत आहे. शनिवार, 12 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चिनावल गावातील तिघा महिलांनी नेहते यांच्या शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून केळी झाडांच्या रोपासाठी ठेवलेले पिल कापून सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान केले. नेहते यांनी या प्रकाराबाबत सावदा पोलिसात तक्रार दिल्यानंतर तीन महिलांविरोधात भादंवि 447 व 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व तीनही महिलांना पोलिसांनी अटक केली. तपास सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक मजहरखान पठाण करीत आहेत.

केळीचे नुकसान ; 16 बकर्‍या कारवाईच्या कोंडवाड्यात
एकीकडे चिनावलच्या शेतकर्‍याचे नुकसान झाले असतानाच चिनावल शिवारातीलच एका शेतकर्‍याच्या शेतात बकर्‍या शिरल्यानंतर नुकसान झाल्यानंतर शेतकर्‍याने तक्रार सावदा पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांसह चिनावल पीपक संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी धाव घेत 16 बकर्‍यांना सरळ कोंडवाड्यात टाकले. या प्रकारानंतर बकर्‍या चारणार्‍यांमध्ये तसेच पीक संस्थेसह शेतकरी व ग्रामपंचायत प्रशासनात काही वेळ जोरदार बाचाबाची झाली.

वादानंतर यंत्रणेची धाव
पोलिस पाटील निलेश नेमाडे, सावदा पोलिस ठाण्याचे हवालदार विनोद पाटील, संजीव चौधरी, मजहर तडवी, होमगार्ड अनिल तडवी, चिनावल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संतोष सपकाळे, चिनावल पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन सोनजी नेमाडे, वॉचमन हुना नेमाडे आदींनी धाव घेतली.