मुक्ताईनगर। शेतकर्यांच्या केळी पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा न करता शेतकर्यांना ही रक्कम त्वरीत अदा करा. सदर प्रकरणात दिरंगाई झाल्यास शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशार्याचे निवेदन शिवसेनेतर्फे तहसिलदार जितेंद्र कुंवर यांना देण्यात आले.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
शेतकर्यांनी केळीचा पीक विमा उतरविला होता. त्यानुसार शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून केळी पीक विम्याची रक्कम शासनामार्फत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकांना निर्देश देण्यात आले आहे. मात्र बँकांमार्फत सदरील विमा योजनेची रक्कम शेतकर्यांच्या बचत खात्यात जमा न करता ही रक्कम कर्ज खात्यावर वळविण्याकरीता बँकांतर्फे बचत खात्यावरील व्यवहार बंदचा नियम काढण्यात आला आहे. तसेच मार्च 2017 च्या विधानसभा अधिवेशनातील शासन निर्णयानुसार सदरील केळी पीक विमा योजनेची रक्कम कर्ज खात्यात जमा न करता त्यांच्या बचत खात्यात जमा करावी असा शासन निर्णय असतांना बँकांतर्फे शेतकर्यांवर अन्याय केला जात आहे. तरी रक्कम वर्ग करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली असुन आंदोलनचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंगी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, प्रफुल्ल पाटील, तालुका प्रमुख छोटु भोई, सुनिल पाटील, अफसर खान, असगर शेख, राजु हिवराळे, निलेश बोराखेडे, गणेश टोंगे, बबलु वंजारी उपस्थित होते.