रावेर: केळी उत्पादकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या फळपिक विमा योजनेत यावर्षी केलेल्या बदलांबाबत केळी उत्पादक शेतकर्यांचा पाठपुरावा सुरू असून, बुधवारी जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातून ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत केळी उत्पादक शेतकर्यांनी मागील वर्षी ठेवण्यात आलेले निकषच कायम करण्याचा सूर लावला. मागील 10 वर्षांपासून हवामान तज्ज्ञ व अधिकार्यांच्या माहितीतून ठरविण्यात आलेले निकषांचा समावेश हा 2019 च्या निकषांमध्ये असून, तेच कायम ठेवण्याबाबत आग्रह बैठकीत धरण्यात आला. जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात कृषी आयुक्त, कृषी संचालक व केळी उत्पादक यांच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वादळ किंवा वार्याच्या वेगासाठी पंचनाम्याची अट रद्द करावी व ताशी 20किमी वेगावर ही विमा मंजूर करावा अशी मागणी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी केली. मागील वर्षाच्या मंजूर विमा रकमेपैकी अजून ही काही शेतकर्यांची रक्कम विमा कंपनीने खात्यात टाकली नसून त्याबाबतची चौकशी करण्याची मागणी निंभोरा येथील सुनिल कोंडे यांनी आयुक्तांकडे केली. याबाबत काही तक्रारी असून, चौकशी करण्याची ग्वाही धीरजकुमार यांनी दिली.
फळपीक विमा योजनेतील बदलांबाबत मागील वर्षाचे निकष कायम ठेवण्याबाबत व विमा कंपनी उशिरा पैसे देत असल्यास 50दिवसांचे व्याजही त्यांनी द्यावे, अशी मागणी तांदलवाडी येथील शशांक पाटील यांनी केली. विशाल अग्रवाल यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी अतिथंडीमुळे किंवा अति उन्हामुळे अडचणी येत असून, निर्यातक्षम केळी बागांसाठी विम्याची मदत होईल, असे निकष देण्याचे सांगितले.
गणपूर (ता. चोपडा) येथील एस. बी. पाटील यांनी या फळपीक विम्याच्या इतर कंपनीऐवजी राज्य सरकारने स्वतःची कंपनी स्थापन करावी व राज्याचा हिस्सा त्या कंपनीला द्यावा अशी सूचना केली. केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी मागील ऑनलाईन बैठकीचा वृतांत देत मागील निकषाबाबत आग्रह ठेवला. बलवाडी येथून अमोल पाटील यांनी विमा कंपनीच्या नफ्याचे गणित सांगत जुन्या निकषातही विमा त्या कंपन्यांना परवडत असल्याचे सांगितले.
जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात झालेल्या ऑनलाईन बैठकीस कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी सहसंचालक अनिल भोकरे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील,फळगायतदार संघटनेचे अध्यक्ष व निंबोलचे प्रगतीशील शेतकरी रामदास पाटील, गणपूरचे एस बी पाटील, निंभोर्याचे सुनील कोंडे, धरणगावचे डॉ.सत्वशील पाटील, मोरगावचे आर व्ही पाटील, तांदलवाडीचे शशांक पाटील, निंबोलचे मोहन पाटील, विजय पाटील, गोरगावले (ता. चोपडा) येथील भागवत महाजन, जीवन पाटील, कठोरा (ता. चोपडा) येथील भूषण पाटील यांसह शिरपूर येथून के. डी. पाटील, रावेरहून विशाल अग्रवाल, ऐनपूरहून भागवत पाटील, विकास महाजन, प्रवीण महाजन यासह बलवाडी येथून राहूल पाटील व अमोल पाटील, स्वप्नील पाटील उपस्थित होते. पुणे येथून कृषी आयुक्त धीरजकुमार, आयुक्त कार्यालयातील दीपाली देवरे, कृषी संचालक डॉ. के. पी. मोते यांसह जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक संभाकी ठाकूर,कृषी सहसंचालक अनिल भोकरे यांसह कार्यालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.