रावेर : राज्यात राबविण्यात येणार्या पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ केळी विमा योजनेतील केळी पिकाच्या निकषामध्ये गत वर्षी तापमानासाठी पाच दिवसांचा असलेला निकष यावेळी 15 दिवसांचा केल्याने या योजनेचा शेतकर्यांना शून्य लाभ होणार असल्याने निकष पूर्वीप्रमाणेच करावे, अशी मागणी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केली आहे.
हा तर केळी उत्पादकांवर अन्याय
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्यात फळ पिकांसाठी पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना राबविण्यात येते. मागील पाच वर्षात उन्हाळ्यासाठी जास्तीत-जास्त 45 अंश सेल्सिअस तापमान व हिवाळ्यासाठी कमीत-कमी 8 अंश सेल्सियस तापमानाचा पाच दिवसांचा निकष लावण्यात आला होता. केळीच्या फळ पीक विम्यासाठी गतवर्षी असलेल्या निकषात यावर्षी शासनाने बदल केला असून निकषाचा बदल केळी उत्पादक शेतकर्यांवर अन्यायकारक आहे. आतापर्यंत दरवर्षासाठी लागू असलेली ही योजना निकषात बदल करीत यावर्षीपासून 2020 ते 2023 अशी तीन वर्षासाठी लागू केलेली आहे. तर उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानाचे निकष 5 दिवसावरून 15 दिवस करण्यात आले आहे. केळीसाठी मागील वर्षाप्रमाणेच सर्व निकष ठेवावेत, अशी मागणी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.