मुंबई :- राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासून उमेदवारांच्या जातीवरून चर्चा सुरू आहे. देशातील सर्वोच्च पदासाठी याआधी अशी चर्चा कधीच झाली नाही. केवळ जात हीच आमची ओळख नसून या व्यतिरिक्त देखील आमची ओळख आहे, असे प्रतिपादन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मिराकुमार यांनी केले.
आरक्षण रद्द करा!
यावेळी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना मिराकुमार म्हणाल्या की, मी आरक्षणाचा विरोध करते. जातीच्या आधारावर काम निर्धारित केले गेलेय. त्यावरून आरक्षण निर्माण केले गेलेय. आता आरक्षणाला समाप्त करा, मग आपण दुसरे आरक्षण तयार करु, असे त्या म्हणाल्या. जातीवरून चाललेल्या चर्चेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, या निवडणुकीकडे दलित विरुद्ध दलित असे बघणारे कोण आहेत? मला आनंद आहे की ह्यावर चर्चा होतेय. आजपर्यंत राष्ट्रपती पदासाठी जातीवर कधीच चर्चा झाली नाही. रामनाथ कोविंद आणि माझ्या इतर कोणतीही विशेषणे नाहीतच का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. हे विचार चुकीचे. हे विचार बुरसटलेले आहे, हर विचार बदलणे आवश्यक असल्याचे मिराकुमार म्हणाल्या.
ठाकरे-विखेपाटीलांना जागाच नाही!
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकर आ. नारायण राणे, संजय निरुपम, जोगेंद्र कवाडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अबू आझमी, राजेंद्र गवई, सी. पी. जोशी, मोहन प्रकाश , सचिन सावंत यांची उपस्थिती होती. मात्र यावेळी माणिकराव ठाकरे व राधाकृष्ण विखेपाटील यांना मंचावर जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.
आकड्यांपेक्षा आंतरआत्म्याचा आवाज महत्वाचा
सध्या सगळीकडे आकड्यांवरून चर्चा सुरू आहे. मात्र मला आकड्यांची चिंता नाही.जर आकडे त्यांच्या बाजूने आहेत, तर मग निवडणूक कशाला? त्यांना विजयी घोषित करा, असे मिराकुमार म्हणाल्या. जीवन समतल चालत नाही. राजकारण तर बिलकुल नाही. मला पराभवाची चिंता नाही. सगळ्या आकड्यांपेक्षा आंतरआत्म्याचा आवाज महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या. अमहमदाबाद येथून महात्मा गांधींच्या विचारांकडून ऊर्जा घेऊन मुंबईत आले असल्याचे सांगत सहिष्णू विचारांच्या लोकांना साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
पत्र लिहून केली विनंती
मिराकुमार यांनी सांगितले की, त्यांनी या निवडणुकीत सर्वांना पत्र लिहून विनंती केली आहे. आपला देश एका विशिष्ट परिस्थितीत आहे. देशाच्या हितासाठी सहिष्णू विचारांच्या उमेदवाराला समर्थन द्या असे आवाहन सर्व मतदार प्रतिनिधींना पत्र लिहून केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील परंपरेचा दाखला देत राष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
देशात वातावरण चिंताजनक
देशात विविधता, बहुधर्मी लोकांचा निवास आहे. मात्र अगदी क्षुल्लक कारणांवरून इथे हत्या केल्या जात आहेत. निरपराध लोकांच्या हत्या होणे हे वातावरण फार चिंताजनक आहे. मला ह्या गोष्टींची चिंता आहे. सध्याचे सरकार हे मजबूत सरकार आहे. त्यांनी यावर कठोर उपाययोजना करायला हव्या, असेही त्या म्हणाल्या.