केवळ झोपमोड केल्याने चिमुरडीला चटके

0

हडपसर । झोपमोड झाल्याच्या कारणावरून पाच वर्षीय चिमुरडीच्या गुप्तांगासह सर्व अंगावर चटके दिल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली. हा सर्व प्रकार शुक्रवारी (दि.10) उघडकीस आला. याप्रकरणी या चिमुरडीच्या शेजारी राहणार्‍या रजनीश तिवारी (28, रा.गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. धक्कादायक म्हणजे ही मुलगी तिची स्वतःची नसून तिच्या मैत्रिणीची आहे. फिर्यादींनी गोंधळेनगर परिसरात कामानिमित्त काही खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. याठिकाणी ही चिमुरडी नेहमी येत असते. दरम्यान, शुक्रवारी ही चिमुरडी नेहमीप्रमाणे आली असताना फिर्यादींना तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. त्यांनी विश्‍वासात घेत विचारपूस केली असता हा भयानक प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली. केवळ मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून या चिमुरडीला चटके देण्यात आले, शिवाय तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर मारहाण केल्याच्या खुणा दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून शनिवारी संबंधित महिलेला अटक केली.

सात महिन्यांची असताना आई सोडून गेली
तिची चौकशी केली असता, चिमुरडी आरोपी महिलेची नसून तिच्या मैत्रिणीची आहे. ती सात महिन्यांची असतानाच तिच्या आईने तिला सोडून पळ काढला. तेव्हापासून ही महिलाच तिला सांभाळत होती. काही दिवसांपूर्वी ती झोपली असता चिमुरडीने तिची झोपमोड केल्याने त्याचा राग येऊन तिला अशाप्रकारे चटके दिल्याचे तिने सांगितले.