केवळ भारत-पाक क्रिकेट सामन्यावेळीच देशप्रेम नको

0

मुंबई । भारत-पाकिस्तानचा क्रिकेट सामना असतानाच अनेक नागरिकांचे देशप्रेम उफाळून येते. मात्र, देश व सैनिकांना कायम नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले. काल्हेर ग्रामपंचायतीने उभारलेल्या विकासकामांचे लोकार्पण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाजपचे खासदार कपिल पाटील होते. या वेळी माजी आमदार योगेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती रविना जाधव, सरपंच श्रीधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेष पाटील, देवा जाधव, जयवंत पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे आदी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री भामरे म्हणाले, ॠॠदेशाच्या तिन्ही टोकावरील भौगोलिक सीमांची परिस्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी 20 हजार फुटांचा डोंगर आहे, तर काही ठिकाणी केवळ 100 मीटरवर पाकिस्तानची चौकी आहे. विपरीत हवामानात देशाचे संरक्षण करण्यासाठी सैनिक प्राण पणाला लावतात. त्यांना देशातील जनतेने पाठिंबा द्यायला हवा. केवळ भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी देशप्रेम उभाळून येता कामा नये, तर आपण देशाचे सैनिक आहोत, ही भावना ठेवून नागरिकांनी देश व सैनिकांमागे उभे राहावे.

तब्बल 22 ते 25 हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झालेला देशात भिवंडी हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे, अशा शब्दांत भामरे यांनी खासदार कपिल पाटील यांचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून प्रत्येक गावात काँक्रीटचे रस्ते तयार केले जातील. त्यातून पुढील 50 वर्ष रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत.

भिवंडीत मेट्रो रेल्वेसह सहा पदरी बायपास मंजूर झाला आहे. त्याचे एप्रिलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कामांचे श्रेय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचे आहे. मात्र, त्याबाबत राजकारण केले जात आहे, असा आरोप खासदार कपिल पाटील यांनी केला. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) खाडीतून रेती काढण्याबाबत बंदी घातली. मात्र, त्याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्यातून हजारो भूमिपूत्रांना दिलासा मिळेल, असा विश्‍वास खासदार पाटील यांनी व्यक्त केला.