केवळ मूल्ये जपणारी पिढीच संपूर्ण जग बदलू शकते : मुख्यमंत्री

0

पुणे । नैतिक मूल्यांशिवाय असणारे शिक्षण हे केवळ माहिती असते, पण मूल्यांना धरून शिकविले जाणारे शिक्षण हे ज्ञान बनते. केवळ मूल्ये जपणारी पिढीच संपूर्ण जग बदलू शकते. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी’ (एमआयटीडब्ल्यूपीयू) च्या उद्घाटन प्रसंगी केले.

याप्रसंगी डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, साधू वासवानी मिशनचे दादा जे.पी. वासवानी, कुलगुरू डॉ. जय गोरे, नालंदा विश्‍वविद्यालयाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, नानिक रुपानी, डॉ. अरुण निगवेकर, राजू मंथना, श्रीकांत भारतीय, रोशनलाल रैना, हरिभाई शहा, माईर्स एमआयटीचे कुलसचिव नाना कुलकर्णी, अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, सचिव डॉ.मंगेश तु.कराड, विश्‍वस्त प्रा, प्रकाश जोशी, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. सुचित्रा नांगरे-कराड, ज्योती कराड-ढाकणे आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, सध्या जगात सर्वत्र युद्ध होताना दिसत आहे. अशांततेची लाट सर्वत्र पसरली आहे. आपण अशांती, हिंसा, भ्रष्टाचाररूपी अंधारात चाचपडत असताना मूल्यरूपी प्रकाशच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतो. सध्या प्रत्येकालाच शांतता हवी आहे. एमआयटी कॉलेज ज्या पद्धतीने मुलांना घडवत आहे. त्याचे अनुकरण इतर कॉलेज व विद्यापीठांनी करणे गरजेचे आहे. तसेच हे विश्‍वशांतीचा ध्यास असणारे विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात असल्याचा मला अभिमान आहे. आज आपण मोबाईल, संगणक आदी तंत्रज्ञानाचा चांगला आणि वाईटही वापर करतो. मात्र ज्याला नैतिक अधिष्ठान आहे, मूल्यांची बैठक ज्या व्यक्तीस आहे. ती व्यक्ती नक्कीच त्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि चांगलाच वापर करेल.

डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला विश्‍वशांतीचा संदेश देण्यात हे विद्यापीठ अग्रेसर असेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान अणि विश्‍वशांतीचा समन्वय साधणार आहोत. डॉ. माशेलकर म्हणाले, ज्या काही समस्या समाजासमोर आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.साधू वासवानी म्हणाले, राजकारणामुळे कधीच आपला देश बदलला जाणार नाही. यासाठी सर्वांना एकच करावे लागेल, ते म्हणजे आपल्याला आपल्या हृदयाची दारे उघडावी लागतील.

प्रा. राहुल कराड म्हणाले, एमआयटी हा एक मैलाचा दगड आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून शिक्षण देणाच्या कार्याची सुरुवात येथूनच झाली. स्टार्ट अप इंडिया आणि डिजिटल इंडियासाठी हे एक केंद्र ठरेल. मायकेल नोबेल म्हणाले, खरे तर आज संपूर्ण जगातून शांती जणू हरवली आहे. ती हरवलेली शांती पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी हे विद्यापीठ नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. यावेळी नानिक रुपानी व डॉ. जय गोरे यांनीही विद्यापीठासंबंधी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.

आदर्श नागरिक तयार होतील
डॉ. विजय भटकर म्हणाले, या विद्यापीठाच्या निमित्ताने संपूर्ण भारताला एक असे विद्यापीठ मिळाले आहे, येथून आदर्श नागरिक बाहेर पडतील. जो विद्यार्थी विज्ञान व तंत्रज्ञानासोबतच शांतीचा, विश्‍वशांतीचा संदेश समाजाला देण्यासाठी सज्ज असेल.