मुंबई । गेल्या साडेतीन चार वर्षांपासून सत्तेत आल्यापासून राज्यातील बहुसंख्याक, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणचं नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी सरकारचे सातत्याने प्रयत्न करत आहे. तळागाळातील विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे सरकार कोठेही कमी पडणार नाही, असे ठोस आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. विधानपरिषदेत 260 अनव्ये शिक्षणावर चर्चा करण्यात आली त्यास उत्तर देताना ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी ही चर्चा ठेवण्यात आली होती, आज त्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मत मांडले त्यानंतर शिक्षणमंत्री यांनी उत्तर दिले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. शिक्षकांचे काम ऑनलाइन केल्याने कामकाजात सुसूत्रता आली. बोर्ड परीक्षा नापास झाल्यानंतर लगेच फेर परीक्षा घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले नाही, हा धाडशी निर्णय शासनाने घेतला. परंतु, विरोधकांनी कधीच याचे कौतुक केले नाही, अशी खंत शिक्षणमंत्री यांनी व्यक्त केली.
चेहरा बुद्धिमत्तेने उजळेल
शिक्षणामध्ये महाराष्ट्र देशात 16 क्रमांकावरून तिसर्या क्रमांकावर आले. राज्यातील विद्यार्थ्यांचा चेहरा बौद्धिकदृष्ट्या उजळून काढण्याचे काम हे सरकार करत आहे. साडेतीन वर्षांत कोणाच्या नजरेत येणार नाही, असे छोट्या छोट्या गोष्टी सरकारने केल्या आहे. मात्र, या छोट्या छोट्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात मोठे बदल झाले असल्याची माहिती यावेळी शिक्षणमंत्री यांनी दिली. अंध विद्यार्थ्यांना मोठ्या आकाराचे पाठ्यपुस्तक दिले ही बाब फार मोठी नाही. परंतु, त्यामुळे अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेड पडला असल्याचे तावडे यांनी सांगितले.
तरुणाई वार्यावर
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी तरुणांनी भाजपला सत्ता मिळाल्यास बेरोजगारी कमी होऊन आपल्या हाताला रोजगार मिळेल या आशेने डोक्यावर घेत सत्तेत बसवले. मात्र, सत्तेत आल्यानंतर या सरकारने तरुणाईला वार्यावर सोडले आहे. आज बेरोजगारी वाढली आहे असल्याचे आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. चार वर्षांपूर्वी 15 हजार पोलीस भरती होत होती. मात्र, हे सरकार सत्तेत आल्यापासून 6 हजारांपेक्षा जास्त पदे भरली गेली नाही. त्यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. एमपीएससी परीक्षेत बोगस उमेदवार बसवण्याचे प्रकार समोर आले आहे त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी मुंडे यांनी केली.