मुंबई । मुंबईकर सतत पायाला भिंगरी लावून फिरत असतात असा शब्द प्रयोग आपण बर्याच वेळी ऐकला असेल. मुंबई शहर हे धावपळीचे शहर म्हणून जगप्रसिद्ध आहे, येथे कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नाही, पण याच सवयीमुळे चाकरमान्यांचे हृदय संकटात येत आहे. मुंबईकरांच्या खाण्याच्या व झोपण्याच्या वेळेमध्ये कधीच समतोल नसतो यातच ऑफिसमधील टार्गेट्स, कामाच्या ठिकाणाहून दूर असणार्या घरांमुळे रोजचा 4 ते 5 तासांचा प्रवास, नातेसंबंधामधील ताणतणाव व वाढती महागाई अशा असंख्य विवंचनेत असलेला मुंबईकर हृदयविकाराच्या त्रासाला सामोरे जात असले तरीही या आजाराबाबत ते अजूनही गाफील असल्याचे समोर आले आहे. घडयाळाच्या काट्यावर धावणार्या मुंबईत दररोज 80 जणांचा मृत्यू हृदयविकाराने होत असल्याची धक्कादायक बाब 2015 साली उघडकीस आली होती. रोजच्या व्यायामाचे महत्त्व फक्त 20 टक्के मुंबईकरांमध्ये आहे, असे दिसून आले आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांची खाण्याच्या व जेवणाच्या अनियमित वेळा व पुरेसा व्यायामाचा अभाव या बाबी हृदयविकाराला आमंत्रण देणार्या ठरत असून मुंबईकरांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी गेला महिनाभर मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील कॉर्पोरट पार्क, मल्टिप्लेक्स, मॉल्स व कॉलेज याठिकाणी सायकल (जिममध्ये असणारी) ठेवली आहे. ही सायकल चालविल्यावर तेथे उपस्थित असलेल्या हॉस्पिटलच्या प्रतिनिधींकडून बर्न झालेल्या कॅलरीजची नोंद करून घेतली जाते व आपल्या शरीरात अतिरिक्त कॅलरीजमुळे काय नुकसान होते याचीही माहिती दिली गेली. ही सायकल चालवल्यानंतर अनेक मुंबईकरांना आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून कितपत फिट आहोत याबाबत प्रबोधन होण्यास मदत होते.
मुंबईकरांची व्यथा
मी रोज सकाळी 8 वाजता घर सोडतो व घरी पोहोचण्यास मला रात्रीचे दहा वाजतात, मी विमा क्षेत्रात असल्याने मला आरोग्याचे महत्त्व पटते. परंतु, वेळेअभावी मला व्यायामाला वेळच उरत नाही. कारण माझे रोजचे 4 तास फक्त प्रवासातच जातात व हल्ली मुंबईत जागोजागी मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे ट्राफिकचा त्रासही सहन करावा लागतो, अशी बोलकी प्रतिक्रिया रोज अंधेरीवरून कुलाब्याला कामासाठी येणार्या श्रीधर सोनावणे यांनी दिली.