सर्वच जातींमध्ये गरीब असतात आणि ज्या घरात वा कुटुंबात अशी योजना पोहोचली; त्याने भाजपाला मत दिलेले असू शकते. ही वस्तुस्थिती आहे. पण तिकडे बघायचे़च नाही, असा ठाम निर्धार केल्यासारखे विश्लेषण होत असेल, तर दोष मतदाराचा नसून विश्लेषक अतिशहाण्यांचा असू शकतो. 1990 नंतर मंडल सवलतींनी जे जातीपातीचे राजकारण भारतात सुरू झाले, तेव्हापासून मतदान जातीनिहाय होत असल्याचा एक सिद्धांत काही अभ्यासकांनी प्रस्थापित केला. त्यात काही प्रमाणात तथ्य होते. पण म्हणून तेवढ्याच आधारावर मतदान होत राहिलेले नाही. अनेकदा परिस्थितीनुसार भलतेच निकाल लागलेले आहेत. मागल्या लोकसभेतही त्याची प्रचिती आलेली आहे. पण आपले शहाणे मात्र 1990 च्या कालबाह्य सिद्धांतामधून बाहेरच पडायला तयार नाहीत. म्हणूनच मग भाजपाला अपुर्व जागा मिळाल्या, तर त्यांच्या जाती शोधण्याचा उद्योग सर्व़च वाहिन्यांवर चालू होता.
कुठल्या जाती मोदींवर फ़िदा आहेत वा कुठल्या जातींनी भाजपाला भरभरून मतदान केले, त्याचे विश्लेषण आता मतमोजणीच्या निकालानंतर चालू झाले. त्याचा शोध या लोकांना मते मोजली गेल्यावरच कसा लागला? समाजात फ़िरताना वा वावरताना विविध जातीच्या लोकांशी आपला संपर्क येत असतो. त्यांच्या बोलण्यातूनही अशा मतदाराचा साधारण कल कुठे आहे, त्याचा अंदाज येत असतो. तसा यापैकी कुणाही शहाण्याला आधीच कल कसा समजला नव्हता? उत्तरप्रदेशचे मतदान सुरू झाल्यावर पहिल्या दोन फ़ेर्या झाल्या. तो भाग प्रामुख्याने पश्चीम उत्तरप्रदेशचा असून, तिथले जाट व मुस्लिम भाजपाच्या विरोधात ठाम उभे रहाणार असल्याची हमी यातलेच अनेक राजकीय अभ्यासक देत होते. अखेरच्या फ़ेरीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणशीत तीन दिवस तळ ठोकून बसले, तर पुर्व उत्तरप्रदेशात अधिक जागा मिळवण्याची त्यांना गरज वाटते, असाही निष्करर्ष काढला गेला होता. त्याचे कारण पश्चीम भागातील जागा गमावण्याची भितीच असल्याचेही सांगितले जात होते. मुस्लिम वा जाट यांच्या मतांविषयी इतकी ठाम गोष्ट सांगणारे, आता तोंडघशी पडले आहेत. कारण संपुर्ण उत्तरप्रदेशात बहुतेक जागी भाजपाने तितकेच मोठे यश मिळवले आहे. त्याचे कारण सर्वच मतदाराने जातपात विसरून भाजपाला कौल दिलेला आहे. अपवाद असेल तर तो मुस्लिम मतांचा म्हणता येईल. जितक्या प्रमाणात अन्य समुदाय भाजपाला मत द्यायला पुढे सरसावले, तितक्या प्रमाणात मुस्लिमांनी भाजपाला मत दिलेले नाही. कारणही उघड आहे. भाजपाने एकही मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवला नव्हता. उलट बाकी सर्वच पक्षांनी फ़क्त मुस्लिमांचीच मते आपल्याला मिळावीत, म्हणून आटापिटा चालविला होता. सर्वच जातीधर्माची मते आपल्याला मिळावी असे अन्य कुठल्याच पक्षाला वाटले नव्हते, ही वस्तुस्थिती आहे.
आता निकाल लागल्यावर भाजपाने आपल्या सोबत कुठल्या लहानसहान पक्षांना घेतले व त्यांचे मतदार कुठल्या जातीचे आहेत, त्याची माहिती गोळा केली जाते आहे. पण उमेदवार जाहिर झाले, तेव्हा कोणीही भाजपाच्या सोबत कुठले पक्ष आहेत वा ते पक्ष कुठल्या जातीचे प्रतिनिधीत्व करतात, याची चर्चा केलेली नव्हती. त्यापेक्षा राहुल व अखिलेश यांच्या एकत्र येण्याने भाजपाच्या पायाखालची वाळू कशी सरकते आहे, त्याचीच वर्णने सांगितली जात होती. यापैकी पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेत भाजपा इतके यश कसे मिळवून गेला, त्याचाच या शहाण्यांनी अभ्यास केलेला नाही. त्याचप्रमाणे पुर्वीच्या विधानसभा मतदानात मायावती वा मुलायमचे पक्ष कशाला बहूमतापर्यंत पोहोचले; त्याचेही वास्तविक विश्लेषण झालेले नव्हते. पुर्वीच्या निवडणूकांमध्ये मतदानाला मिळणारा प्रतिसादच कमी असायचा आणि त्यात मिळणार्या मतांवर मुलायम वा मायावती मोठी बाजी मारून जात होते. अमित शहांनी केलेला पहिला चमत्कार म्हणजे उत्तरप्रदेशातील मतदानाच्या टक्केवारीतच वाढ करून घेतली. आपण वाढवलेल्या मतदानातील मोठा हिस्सा आपल्या पक्षाला मिळत असतो. मागल्या अनेक विधानसभांपेक्षा यावेळी मतांची टक्केवारी वाढलेली आहे आणि त्यात वाढलेला हिस्सा मोठ्या प्रमाणात भाजपाच्या पारड्यात पडून, त्याचे वजन वाढलेले आहे. हेच लोकसभेतही झाले होते आणि आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. पण असे तपशील शोधून काढणे म्हणजे अभ्यास असतो आणि त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट मायावती, मुलायमना घ्यायचे नसतात. राहुल प्रियंकाचे भजन करताना कष्ट करावे लागत नाहीत. म्हणून हेच शहाणे राहुल अखिलेशना ‘युपीके लडके’ म्हणून ओवाळत होते आणि आता जाती शोधत आहेत. वास्तवात सगळ्या जातीच्या व प्रामुख्याने तरूणांच्या गर्दीने मोदींवर विश्वास दाखवून, भाजपाला अपुर्व यश प्रदान केलेले आहे.
मंडलचा जमाना मागे पडला आहे. आरक्षण वा सवलतींची भिक मागणारी पिढी मागे पडली आहे. नव्या पिढीचा कुठल्याही जातीतला तरूण, आता शिकलेला आहे व त्याला आपल्या कर्तृत्वावर काही करून दाखवण्याची महत्वाकांक्षा आहे. त्याला ़फुकटातल्या वस्तू वा अनुदानाची भिक नको आहे. त्याला कर्तबगारी दाखवण्याची संधी हवी आहे. गरीबाला त्याच्यापर्यंत येऊन पोहोचणार्या व त्याच्या गरजांना भिडणार्या योजना हव्या आहेत. त्या अन्य कुठल्या पक्षांनी दिल्या नाहीत. पण जनधन वा उज्वला गॅस अशा योजना खरेच लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्याचा अनुभव काही लाख लोकांनी घेतला आहे. उरलेल्यांना त्यांचा लाभ आपल्याला उद्यापरवा मिळणार अशी आशा आहे. तो त्यांचा अनुभव आहे, मात्र स्टुडिओत बसून चर्चा रंगवणार्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. म्हणूनच असा मतदार चमत्कार घडवू शकतो, हे कालबाह्य सिद्धांतात अडकलेल्या अभ्यासकांना उमजलेले नाही. पर्यायाने कुठल्याही जातीचा नवा मतदार जातीच्या पलिकडे जाऊन आपल्या भवितव्यासाठी मतदान करतो, हे बघणेच या शहाण्यांना सुचलेले नाही. ते अजून मंडलच्या वा 1990 च्या युगात घुटमळत राहिलेले आहेत. सामान्य मतदार एकविसाव्या शतकात आला आहे. पण त्याच्या मतदानाचे विश्लेषण करणारे आजही विसाव्या शतकातच चाचपडत राहिले आहेत. म्हणूनच त्यांना निवडणूका होत असताना विश्लेषण करता आले नाही, की आता निकाल लागल्यावरही त्याचा अर्थ उलगडून सांगता येत नाही. कारण त्यांचा जनता, जनभावना वा एकूणच घडामोडींची संपर्कच तुटला आहे. म्हणून मग मतदानातील वा निकालातील नसलेल्या जातीपाती शोधणे सुरू आहे. मोदी 2017 मध्ये राजकारण खेळत आहेत आणि त्यांच्या विरोधकांसह अभ्यासकही विसाव्याच शतकात अडकून पडलेले आहेत. ही राजकीय विश्लेषणाची केविलवाणी स्थिती शनिवारी सर्वच वाहिन्यांवर दिसत होती.
– भाऊ तोरसेकर