केशरानंद जिनिंग फॅक्टरीला भीषण आग

0

दोंडाईचा । ब्राम्हणे (ता.शिंदखेडा) येथील केशरानंद जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीला मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमाराला भीषण आग लागली. यात दीड कोटीच्या कापसाच्या आठशे गाठी व सत्तर लाखाची मशनरी जळून खाक झाली. सुमारे दोन कोटीचे नुकसान झाले. अप्पर तहसीलदार व महसुल विभागाने हा पंचनामा केला. दुसर्‍या दिवशीही आगीची धग सुरुच होती. सात बंबांनी दहा राऊंडने म्हणजे एकुण सत्तर बंबच्या क्षमतेने पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आली.केशरानंद उद्योग समुहाचे ज्ञानेश्वर भामरे यांची जिनींग आहे. जिनिंग प्रेसींघ युनिट व केशरानंद कॉटेक्स अश्या दोन यूनिट व कंपनीत आहेत. रात्री बाराच्या सूमारास शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. आगीचे स्वरुप भयानक होते.

या आगीत सात ठिकाणाहून बंब दाखल होण्याच्या अगोदरच जिनिंग प्लॅन्टची मशनरी जळून खाक झाली. ही मशनरी सत्तर लाखाची होती. गोडाऊनमधील सहाशे कापसाच्या गाठी व दोनशे क्विंटल कापसाची कवडी होती. ती सर्व आग व पाण्यामुळे खाक झाली. सुमारे दोन कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दहा अग्निशमन बंबाद्वारे आगीवर नियंत्रण
रात्री दोंडाईचा, शिरपूर, नंदुरबार, धुळे, शिरपूर, शहादा आदी सात ठिकाणाहून पाण्याचे बंब दाखल झाले होते. एका बंबने सरासरी दहा वेळा बंब भरुन पाण्याचा मारा केला. प्रत्येक बंबने सरासरी सत्तर हजार लिटर पाण्याचा मारा केला. तेव्हा आग आटोक्यात येवू शकली. पण नुकसान टाळता आले नाही. आज दिवसभर आगीचे धुर सुरुच होते. स्वतःच्या मालकीच्या टँकरने दिवसभर आग विझविणे सुरुच होते. किमान पन्नास टँकर पाण्याचा मारा झाला आहे. जिनींगमध्ये प्रत्येक युनीट पर्यंत जलवाहीनी टाकलेली होती. आगीची घटना घडल्यावर या जलवाहिनीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली जाते. मात्र, मध्यरात्री लागल्या आगीच्या तीवतेने जलवाहीन्याच जळून खाक झाल्यात. केवळ एकाच दिवसाचा हंगाम राहिलेला होता. त्यापूर्वीच अरिष्ट ओढविल्याचे भामरे यांनी सांगितले. दरम्यान अप्पर तहसिलदार , पोलिस निरीक्षक मुंडे, स्टेट बँकेचे अधिकारी यांनी पंचनामा केला.