जळगाव। केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागच्या माध्यमातून दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना 10 मे बुधवार रोजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. जळगाव जनता सह. बँकेच्या सेवा कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माधवबहुद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नंदू नागराज, प्रमुख अतिथी म्हणून कृषी उपसंचालक अनिल भोकरे आणि नटवर थिएटरचे मेहुल त्रिवेदी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीलकंठ गायकवाड, सेवावस्ती विभाग प्रमुख डॉ.विवेक जोशी उपस्थित होते.
सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांपासून पाठ्यपुस्तक सहयोग योजना कार्यान्वित आहे. यात इयत्ता 9 वी ते 12 वीच्या गरजू विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये पाठ्यपुस्तक देण्यात येते. पहिल्या टप्प्यात दहावीच्या 104 विद्यार्थ्यांना पुस्तक देण्यात आले. अनुल भोकरे यांनी आपल्या प्रमुख भाषणात विद्यार्थी दशेत दुसर्यांकडून पुस्तक मिळवून अभ्यास करत असल्याच्या आठवणी व्यक्त केल्या. यावेळी आपल्या भावनांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करून दिली.
पुढील वर्षी अन्य गरजूंना मदत करण्याचेही आश्वासनपुस्तकांचे व्यवस्थित जपवणूक करून पुढील वर्षी अन्य गरजूंना मदत करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांकडून घेतले. मेहुल त्रिवेदी यांनी या उपक्रमाची स्तुती करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्षीय भाषणात नंदू नागराज यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करत या उपक्रमासाठी 51 हजाराचा धनादेश सेवावस्ती विभागाचे प्रकल्प प्रमुख डॉ.विवेक जोशींना सूर्पूद केला. कार्यक्रमात कविता दीक्षित यांनी प्रास्ताविक केले.