केसांची जट सोडविताना मनाचे गुंते सोडविण्याचे आव्हान – नंदिनी जाधव यांचे मत

0

कविता रसिक मंडळी आणि रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‘जट-रूढी एक भीषण परंपरा‘ विषयावर मुलाखत

पुणे : महिलांनी स्वत:चे शोषण थांबविण्यासाठी कणखर झाले पाहिजे. केसांची जट सोडविताना मनाचे गुंते सोडविण्याचे आव्हान माझ्यापुढे होते. अशिक्षित आणि सुशिक्षित समाजातही अनेक अंधश्रद्धा खोलवर रुतलेल्या आहेत. त्यासाठी प्रबोधन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी हे महत्वपूर्ण मार्ग आहेत, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदस्थ आणि कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी व्यक्त केले. कविता रसिक मंडळी आणि रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जट-रूढी एक भीषण परंपरा या विषयावर आयोजित कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. कविता रसिक मंडळीचे भूषण कटककर आणि अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी जाधव यांच्याशी प्रकट मुलाखतीव्दारे संवाद साधला.

तीन वर्षांत 86 महिलांच्या जट कापल्या…

जाधव पुढे म्हणाल्या की, स्वत: चे सुस्थितीत सुरू असलेले ब्युटी पार्लर बंद करून महिलांचे वैचारिक सौंदर्य वाढविण्याच्या विचारातून मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबर काम करू लागले. केसातील गुंता सोडवताना मनाचा गुंता सोडविणे खूप कठीण होते. देवाची, मृत्यूची भिती घालून महिलांना अंधश्रद्धेच्या दलदलीत ढकलणार्‍यांच्या विरोधात सगळ्यांनाच उभे राहिले पाहिजे. गेल्या तीन वर्षांत मी 86 महिलांच्या जट कापल्या आहेत. यातील केवळ 2-3 महिला महाराष्ट्रातील होत्या, तर उर्वरित सर्व महिला या पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या पुणे जिल्ह्यातील होत्या. इतकेच नाही तर पोलीस विभागातील एका महिलेची, न्यायधीश महिलेची, राष्ट्रीय बँकेतील उच्च पदस्थ अधिकार्‍याची पत्नी अशा उच्च शिक्षित महिलांची जट कापल्याचे त्यांनी सांगितले.

महिला अंधश्रध्देच्या सर्वाधिक बळी

सुनिती लिमये म्हणाल्या की, महिला अंधश्रध्देच्या सर्वाधिक बळी पडतात. अंधश्रध्देच्या मुळाशी मानसिक अस्वास्थ्य हे एक महत्वपूर्ण कारण असते.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती म्हणून काम करताना अंधश्रद्धा पाळणारे लोक पाहून बरेचदा चीड यायची. राग यायचा. पण त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी सांगितलेले सूत्र म्हणजे ’या लोकांना क्रोधापेक्षा करूणेची गरज आहे’ यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलून गेला.

वैज्ञानिक दृष्टिकोन हाच ज्ञानाचा पाया

प्रज्ञा महाजन म्हणाल्या की, डोक्यावरची जट कापणे म्हणजे कमकुवत मनाचे गुंते सोडविण्यासारखे अवघड आहे. खरेतर वैज्ञानिक दृष्टिकोन हाच ज्ञानाचा पाया असतो. अंधश्रद्धा ही प्रत्येक वेळी प्रत्येक वेगळी असते. भारतात अंधश्रद्धेचे प्रमाण, साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. प्राचीन ग्रीसमधील तत्वज्ञांनी अंधश्रध्देला प्रथम विरोध केला. विज्ञान हे स्थळ, काळ वेळ निरपेक्ष असते. त्याची प्रचिती येते, ढोंगी लोक दावे सिद्ध करू शकलेले नाही.