मुंबई | फोर्टीसचे सहयोगी एस. एल. रहेजा रुग्णालयातील कॉस्मेटिक त्वचाविकार, त्वचाविकार आणि त्वचेवरील लेसर यांच्या तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी स्वत: विकसित केलेल्या क्यूआर६७८ नावाच्या केस वाढवण्याच्या मिश्रणासाठी नुकतेच अमेरिकेचे पेटण्ट प्राप्त केले आहे. क्यूआर६७८मधील रेणू डोक्याच्या त्वचेखाली उत्तेजन निर्माण करून केस पुन्हा वाढण्यास मदत करतात. ही उपचारपद्धती विविध प्रकारच्या केसगळतीसाठी उपयुक्त आहे. यात केमोथेरपीमुळे झालेल्या केसगळतीचाही समावेश आहे. या मिश्रणाची त्वचा-अंतर्गत इंजक्शने घेणे हा पुरुष तसेच स्त्रियांमधील केसगळती थांबवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. केस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करूनही पुन्हा केस गळणा-यांसाठी तसेच केमोथेरपीनंतर केस गळणा-यांसाठीही हा पर्याय उत्तम आहे.
यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासादरम्यान २० ते ६० या वयोगटातील १००० रुग्णांना (६८० पुरुष व ३२० स्त्रिया) या मिश्रणाची त्वचाअंतर्गत इंजक्शने टाळूच्या त्वचेमध्ये केसगळती थांबवण्याच्या उद्देशाने देण्यात आली. प्रत्येक सत्रापूर्वी केस ओढून बघण्याची चाचणी(केस किती पक्के आहेत हे निश्चित करण्यासाठी) घेण्यात आली. चौथ्या सत्राच्या वेळी, आठव्या सत्राच्या वेळी आणि आठ सत्रे झाल्यानंतर दोन महिन्यांनी सुक्ष्म कॅमे-याने व्हिडिओ आणि फोटो घेण्यात आले. अभ्यासादरम्यान सातत्याने शारीरिक तपासणी, प्रश्नावली आणि योग्य अशा प्रयोगशाळेतील तपासणीच्या माध्यमातून रुग्णांच्या सुरक्षिततेचा अंदाज सतत घेण्यात आला. हे मिश्रण माहिमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयातील कन्सल्टण्ट त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर आणि डॉ. देबराज शोम या दोघांनी मिळून तयार केले आहे.
मेंदूतील गाठ काढून टाकण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेनंतरची रेडिएशन्स पूर्ण झाल्यानंतर अलोपेशिया अरेटा अर्थात डोक्यात चाई पडलेल्या एका १३ वर्षांच्या मुलावर या औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. हा मुलगा शाळेत जाण्यास तयार नव्हता तसेच आपली चेष्टा केली जाईल या भीतीने चारचौघांत मिसळतही नव्हता. त्याला केसगळतीवरील नेहमीचा उपचार अर्थात मुखावाटे आणि इंजेक्शनवाटे स्टिरॉइड्स देण्यात आली होती पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता. एक महिन्याच्या अंतराने त्याला क्यूआर६७८ उपचार दहा सत्रांतून देण्यात आले आणि त्याच्या डोक्यावर पुन्हा केस उगवले.
डॉ. रिंकी कपूर या क्रांतीकारी मिश्रणाबद्दल म्हणाल्या, “तुमच्या डोक्यावरचे वैभव ही नक्कीच आत्मविश्वासाची खूण आहे. सध्या उपलब्ध असलेल्या केस उगवण्यासाठीच्या उपचारपद्धतींना मर्यादा आहे. या उपचारांच्या माध्यमातून एका टप्प्यापलीकडे केस पुन्हा उगवणे शक्य नाही. क्यूआर६७९ केवळ केसगळती थांबवत नाही, तर नवीन केस उगवण्यासाठी उत्तेजना पुरवते. या उपचारपद्धतीत वाढीसाठी आवश्यक असे काही घटक टाळूच्या त्वचेतून इंजेक्शनद्वारे दिले जातात. यामुळे आपल्याला हवा तसा आणि प्रभावी परिणाम साधता येतो, जो मूळपेशी किंवा प्लेटलेट समृद्ध प्लाझमा (पीआरपी) यांसारख्या तुलनेने निवडीला कमी वाव असलेल्या उपचारपद्धतीत साधता येत नाही.”
हे उपचार एका ५२ वर्षीय स्त्रीलाही देण्यात आले. स्तनांच्या कर्करोगासाठी घेतलेल्या केमोथेरपीनंतर त्यांचे सर्व केस गळले होते. त्या व्यवसायाने ब्युटिशियन होत्या. त्यामुळे सौंदर्यासाठी उपचार करून घ्यायला आलेल्या ग्राहकांना कसे सामोरे जायचे ही चिंता त्यांना छळत होती. केसगळतीवरील नेहमीचे उपचार आणि औषधांचा काहीच उपयोग न झाल्याने त्यांनी केस परत येण्याची आशाच सोडली होती. स्वत:च्या बाह्यरूपामुळे त्या खूपच निराशही झालेल्या होत्या. केसांचे प्रत्यारोपण हा पर्यायही त्यांच्यासाठी नव्हताच. त्यांना एक महिन्याच्या अंतराने आठ सत्रांत क्यूआर६७८ उपचार देण्यात आले आणि त्यांना त्यांचा आत्मविश्वास परत मिळाला!