चाकण : महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील ‘केहिन फाय प्रा. लि.’ या कंपनीतील कामगारांचा गेल्या 19 महिन्यांपासून रखडलेला वेतनवाढ करार त्वरित करण्यात यावा, या मागणीसाठी केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय संभाजी गायकवाड यांनी रविवारपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. कंपनीतील कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून कंपनीत जेवणाचे डबे न आणता सलग आठ तास काम करून काहीही न खाता अन्नत्याग करण्याचे आंदोलन केले, मात्र व्यवस्थापनाने त्याकडेही दुर्लक्ष केल्यामुळे कामगार संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
2000पासून पगारवाढच नाही
‘केहिन फाय’ ही बहुराष्ट्रीय कंपनी 2000 सालापासून चाकण येथील औद्योगिक वसाहतीत आहे. पण कामगारांची पगारवाढ गेल्या काही वर्षांपासून रखडलेली आहे. कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट व हलाखीची झाली आहे. पगारवाढ करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. व्यवस्थापनाने उत्पादनासंदर्भातील आपल्या मागण्यांचे निवेदन युनियनला सादर केले आहे. उत्पादनासंदर्भातील वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी त्याचे निकष ठरविण्यासाठी बाहेरील प्रमाणित संस्थेकडून कामाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. यासंदर्भात युनियनने वारंवार लेखी व तोंडी व्यवस्थापनास कळवूनही आजतागायत वरील बाबींची पूर्तता व्यवस्थापनाकडून करण्यात आलेली नाही, असा आरोप युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड यांनी केला आहे. कामगारांची पगारवाढ न करणार्या केहिन फाय व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.