टोकियो । जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी भारताला संमिश्र यश मिळाले. भारताच्या किदंबी श्रीकांत, एच एस प्रणॉय, समीर वर्मा आणि सायना नेहवाल यांनी पहिल्या फेरीचा अडथळा पारत स्पर्धेच्या दुसर्या फेरीत स्थान मिळवले. अन्य खेळाडूंमध्ये सौरभ वर्मा आणि बी.साई. प्रणित या भारतीय खेळाडूंचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. श्रीकांतने चीवट झुंजीनंतर चीनच्या तियान हुवेईला गाशा गुंडाळायला लावला. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतला तियानवर विजय मिळवण्यासाठी मेहनत करावी लागली. एक तास चार मिनीटे रंगलेल्या सामन्यात श्रीकांतने तियानचे आव्हान 21-15, 12-21, 21-11 असे परतवून लावले.
अन्य लढतीत समीरने थायलंडच्या कॉसिथ फेट्रादाबचा 21-12, 21-19 असा सरळ पराभव केला. प्रणॉयने दुसर्या फेरीत स्थान मिळवताना डेन्मार्कच्या आंद्रेस एँटानसोनवर 21-12, 21-14 असा विजय मिळवला. सौरभ वर्माला जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या लिन डॉनने रोमहर्षक लढतीत21-11, 15-21, 13-21 असे हरवले. तर कोरियाच्या ली डोंग कयूनने प्रणितचे आव्हान 21- 23, 21-17, 21-14 असे संपुष्टात आणले.
रविवारी कोरियन ओपन सुपर सीरिज स्पर्धा जिंकणार्या पी.व्ही. सिंधूने यजमान देशाच्या मिनात्सु मितानीला पहिल्या फेरीतच घरचा रस्ता दाखवला. सुमारे तासभर चाललेल्या या लढतीत पहिला गेम 12-21 असा गमवणार्या सिंधूने पुढचे दोन्ही गेम 21-15, 21-17 असे जिंकून दुसर्या फेरीत स्थान मिळवले. सायनाने कोर्टवर यशस्वी पुनरागमन करताना थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवाँगचा 21-17, 21-9 असा पराभव केला. दुसर्या फेरीत सिंधूचा सामना निझोमी ओकुहाराशी होईल.